मुंबई : बाल गोपाळ मित्र मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप यांच्या संयुक्त विध्यमाने काळेवाडी-काळाचौकी परिसरात व्यायामप्रेमी स्व. रामचंद्र कडवे स्मृती फोर स्टेशन मशीनसह सुसज्ज व्यायामशाळेचे शानदार उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या हस्ते व्यायामप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झाले. याप्रसंगी बाल गोपाळ मंडळाचे अध्यक्ष सुनिल नागवेकर, सल्लागार तुळशीराम नाकते, व्यायाम प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यानिमित्त नवोदित युवा व्यायामपटूंसाठी जोर व बैठका व्यायाम प्रकारांच्या स्पर्धा देखील २७ मेपर्यंत होणार आहेत. व्यायामशाळा उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभत असल्यामुळे कामगार विभागातील युवकांना नाममात्र फी द्वारे व्यायामाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संयोजक प्रयत्नशील आहेत.
गेली अनेक वर्षे सामाजिक व क्रीडा बांधिलकी जोपासणाऱ्या बाल गोपाळ मित्र मंडळाने युवकांना मोबाईलच्या विळख्यातून सोडविण्यासाठी भविष्यामध्ये विविध समाजोपयोगी क्रीडा उपक्रम आयडियल ग्रुप सहकार्याने राबविण्याचे ठरविले आहे. युवकांना व्यायामाची आवड निर्माण करून देण्यासाठी गणेशोत्सवात नवोदितांची शरीरसौष्ठव स्पर्धा तसेच विविध व्यायाम उपक्रम साकारण्यात येणार आहेत. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप यांच्या मार्फत बाल गोपाळ कॅरम विभाग पुढील महिन्यात सुरु होणार आहे. परिसरातील शालेय खेळाडूंना चँम्पियन कॅरम बोर्डवर सराव मिळणार असल्यामुळे डीएसओ कॅरम स्पर्धेत यश संपादन करण्यासाठी उपयुक्त ठरेल. मंडळाचे पदाधिकारी बळीराम सावळे, प्रवीण शिंदे, अनिल सावळे,  सचिन शिंदे,  विजय चिले, नरेश शिगवण, दत्ताराम पवार, विलास बेलोसे, सुरेश बांडागळे, संजय तळेकर, विश्वास चांदे, चंदन यादव आदी मंडळी उपक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहेत.
०००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *