सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांची माहिती
अशोक गायकवाड
अलिबाग : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ तसेच सुधारणा अध्यादेश २०२१ च्या अनुषंगाने राज्याच्या सागरी क्षेत्रात यावर्षी १ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) रायगड-अलिबाग संजय पाटील यांनी दिली.
या ६१ दिवसांच्या पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिक नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही, याची दक्षता सर्व मच्छिमारांनी घ्यावी, असे आवाहन संजय पाटील यांनी केले आहे. बंदी कालावधीत कायद्याचा भंग करून मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सदर बंदी ही केवळ यंत्रचलित व यांत्रिक नौकांना लागू राहणार असून पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचालित नौकांना लागू होणार नाही. सर्व यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांनी १ जूनपूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक असून ३१ जुलैपूर्वी समुद्रात मासेमारीसाठी जाता येणार नाही.
राज्याच्या सागरी जलधि क्षेत्रात, म्हणजे किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत, बंदी कालावधीत मासेमारी करताना कोणतीही नौका आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) २०२१ च्या कलम १४ अन्वये नौका, मासेमारी साहित्य आणि मासळी जप्त करण्यात येईल. तसेच कलम १७ नुसार कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल.
पावसाळी बंदी काळात मासेमारी करणाऱ्या नौकेस अपघात झाल्यास शासनाकडून कोणतीही नुकसानभरपाई मिळणार नसल्याचेही संजय पाटील यांनी सांगितले. या काळात राज्याच्या सागरी क्षेत्रात मासेमारी नौकांच्या अवागमनासही प्रतिबंध राहणार आहे.
सर्व मच्छिमार सहकारी संस्था, नौकामालक आणि सभासदांनी नियमांचे पालन करून बंदी कालावधीत समुद्रात मासेमारी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, अलिबाग कोळीवाडा, बंदर रोड, कस्टम हाऊसजवळ, अलिबाग येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२१४१-२९५२२१ वर संपर्क करावा, असेही संजय पाटील यांनी सांगितले.
००००००
