तहसीलदार धनंजय जाधव आणि उप अधिक्षक भूमि अभिलेख नितिन आटाळे यांची प्रमुख उपस्थिती
कर्जत : (अशोक गायकवाड)
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१’ अंतर्गत शुक्रवार, १० एप्रिलला महसूल मंडळ कळंब अंतर्गत प्रगती माध्यमिक विद्यालय कळंब येथे महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला रायगड जिल्हा समाजकल्याण सभापती नारायण डामसे, पंचायत समिती सदस्य रेश्मा जोशी, तहसीलदार धनंजय जाधव, उप अधिक्षक भूमि अभिलेख नितिन आटाळे, निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मंडळ अधिकारी कळंब, संतोष जांभळे यांनी केले . यावेळी नागरिक, महिला, शेतकरी, विद्यार्थी तसेच मंडळ कळंब अंतर्गत ग्राम महसुल अधिकारी निलेश पवार, मोहिनी भडांगे, आकाश निकाळे, रणजीत कोळेकर, शशिकांत हुलगुंडे, दर्शना कांबळे, तहसील व भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या महसूल व इतर शासकीय सेवांशी संबंधित प्रश्नांचा तात्काळ निपटारा करण्यावर भर देण्यात आला. शिबिरामध्ये नागरिकांना ७/१२ उतारे, ८-अ उतारे तसेच विविध दाखले यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय ७/१२ अद्यावत करणे, ई-मोजणी, पाणंद रस्त्यांबाबत कार्यवाही, अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क, अकृषिक सुधारणा मार्गदर्शन, पीएम किसान योजना, दुय्यम शिधापत्रिका वाटप, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, आरोग्य तपासणी, मोफत डिजिटल सातबारा, वनपट्ट्यावर सातबारा नावे नोंद करणे, लक्ष्मी मुक्ती योजना, प्रॉपर्टी कार्ड आदी विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रलंबित कामांचा जलदगतीने निपटारा होत असून शासनाच्या “एका दिवसात डिलिव्हरी सेवा” उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय सेवा सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शासनाचा हा उपक्रम सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
०००००
