वाढदिवस सोहोळा थाटामाटात संपन्न
कणकवली (प्रतिनिधी)- माझ्या संसदीय कामकाजाची सुरुवात राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली हे मी माझं भाग्य समजतो. विधानसभेत विरोधी पक्ष नेता म्हणून राणे यांनी केलेली भाषणे ऐकण्याची, बघण्याची संधी मला प्राप्त झाली. अर्थसंकल्पावरील त्यांची भाषणे तर नक्कीच अभ्यासू होती. तरी यापुढेही त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करत राहावे अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार नारायण राणे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.   माजी मुख्यमंत्री, भाजपाचे खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस सोहोळा qqq अतिशय थाटामाटात आणि दिमाखात पार पडला.  राज्यातील महनीय व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नारायण राणे आणि त्यांच्या पत्नी नीलम राणे यांचा सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याला उद्योग मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार  प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, दीपक केसरकर महायुतीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते राज्याच्या विविध भागातून आलेले त्यांचे मित्र, चाहते या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना राणे  अतिशय भाऊक  झाले होते.’आपण पद मिळवण्यासाठी कधी काम केले नाही, मेहनत आणि निर्धार यामुळेच आपण समाजकारणात आणि राजकारणात यशाच्या शिखरावर पोहोचलो’ असे उदगार त्यांनी सत्काराला उत्तर देतांना काढले
शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळेच आपण हे यश मिळवू  शकलो असे म्हणत त्यांनी ठाकरे यांच्या प्रति आपले ऋण व्यक्त केले. राणीसाहेबांच्या हृदयातच कोकण आहे आणि म्हणूनच त्यांनी कोकणच्या  विकासाला दिशा देण्याचे  काम केले  अशा शब्दात फडणवीस यांनी राणे यांचे कौतुक केले. विधिमंडळातील त्यांच्या कामकाजाचा गौरव करताना फडणवीस म्हणाले, अर्थसंकल्पावर ज्यावेळी राणेसाहेब भाषण करायचे त्यावेळी कोणीतरी अर्थतज्ञ बोलतोय असा  भास व्हायचा अशा शब्दात त्यांनी राणे यांचे कौतुक केले.
‘त्यांचा दरारा आपण विधानसभेत बघितला आहे एवढेच नव्हे तर विरोधी पक्षनेता म्हणून ते सरकारला पळता भुई थोडी करायचे हेही आपण पाहिले आहे. एक दिलदार, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व. कामात गुणवत्ता या गुणांसोबतच हजारो लोकांचे जीवनमान त्यांनी बदलून टाकले असे गौरवपूर्ण उदगारही त्यांनी यावेळी काढले.  त्यांचे दोन्ही पुत्र नितेश आणि निलेश हे त्यांचा वारसा समर्थपणे चालवतील असा विश्वास  फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनीही राणे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी केलेली भाषणे वाचा आणि अभ्यासा, असा सल्ला नव्या आमदारांना देत गडकरी म्हणाले,संसदीय इतिहासातला एक आदर्श विरोधी पक्ष नेता म्हणून राणे यांचा उल्लेख करावा लागेल अशा शब्दात गडकरी यांनी राणे यांचा  गौरव केला. सत्ताधाऱ्यांना कैचीत पकडण्याची शैली हे राणे यांच्या कडूनच  शिकावे  असा मोलाचा सल्लाही गडकरी यांनी  नव्या आमदारांना दिला.
वाढदिवसाची भेट…!
राणे हे शब्दाचे पक्के आहेत, तसा मी सुद्धा आहे असे म्हणत येत्या  मे महिन्यापूर्वी मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होईल तसेच रत्नागिरी- कोल्हापूर हा  मार्गही पूर्ण होईल असे गडकरी यांनी जाहीर करत राणे यांना वाढदिवसाची भेट दिली. गेली अनेक वर्ष रखडलेल्या या महामार्गामुळे मी एवढी बदनामी सहन केली आहे की आता उदघाटन  करायला मी येणार नाही. मात्र काम पूर्ण होणार आहे असे त्यांनी जाहीर केले.  ‘कोकणातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम दादांनी केले. भाजपात प्रवेश केल्यानंतर कोकणात भाजपाचे बळ वाढले असे उदगार  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काढले. रायगड जिल्ह्यात ‘राणे पॅटर्न’ राबवण्यासाठी राणेसाहेबांनी मला टिप्स द्याव्यात अशा शब्दात तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *