२५० एकर जमिनीच्या प्रस्तावाला सुधीर मुनगंटीवारांची शिफारस
मुंबई:‘लॉर्ड बुद्धा’ आंतरराष्ट्रीय विद्यापीठ’ स्थापन करण्यासाठी घेरा, पुरंदर, ता. पुरंदर (जि. पुणे) येथील गट क्र.५०,१५१,१९६ वनविभागाच्या अखत्यारीतील ७३६.६३ हेक्टर जमिनीपैकी २५० एकर नापीक, पडीक, दुर्गम झुडपी शासकीय डोंगराळ जमीन उपलब्ध करून देण्याची शिफारस राज्याचे माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाकडे केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठवलेल्या पत्राद्वारे त्यांनी ही शिफारस केली असून, संबंधित प्रस्ताव प्रा. डॉ. गौतम बेंगाळे, मुख्य संयोजक, लॉर्ड बुद्धा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ निर्माण कृती समिती यांच्या वतीने सादर करण्यात आला आहे.
प्रस्तावित विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक तसेच भारतीय ऐतिहासिक वारसा यांसारख्या विविध विषयांवर अभ्यासक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे पुणे परिसरातील शैक्षणिक व सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असेही नमूद करण्यात आले आहे.
घेरा पुरंदर जि. पुणे परिसरातील गट क्रमांक ५०, १५१ व १९६ मधील सुमारे ७३६.६३ हेक्टर क्षेत्रापैकी २५० एकर जमीन विद्यापीठासाठी उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडेही प्रस्ताव सादर करण्यात आला असून, शासनाने यावर सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. या संदर्भात २५ फेब्रुवारी २०२२ पासून केंद्र सरकार व राज्य सरकार याकडे विविध परवानग्यांबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. १४ जुलै २०२५ रोजी विधानसभेत अर्थसंकल्पीय भाषणात सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी शासनाने लाॅर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी केंव्हा उभारणार ? अशी जोरदार विचारणा केली होती. याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री सुभाष सरकार, माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार, खासदार उदयनराजे भोसले, खासदार सुप्रिया सुळे, खासदार विशाल पाटील, खासदार चंद्रकांत हंडोरे, यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री कै.अजितदादा पवार, राज्याच्या मंत्रिमंडळातील छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, संजय शिरसाट, गिरीश महाजन, जयकुमार गोरे, अदिती तटकरे हे मंत्री यांच्यासह आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुनील कांबळे, आमदार राजकुमार बडोले, आमदार राजू खरे, आमदार अभिजित पाटील, माजी आमदार कपिल पाटील, माजी आमदार संजय जगताप आदिंनीही लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी उभारण्याबाबत पत्राद्वारे शिफारस केली आहे.
