धर्मांतराचे धक्कादायक वास्तव
नाशिक : शहरातील नामांकीत बहुराष्ट्रीय कंपनीत महिला अत्याचार, विनयभंग, धर्मांतर प्रकरणातील वेगवेगळे कंगोरे समोर येत आहे. कंपनीत संशयित आपले सावज कसे शोधायचे, त्यांचे मत परिवर्तन कसे करायचे, याची आपबिती तक्रारदारांनी तपास यंत्रणेसमोर मांडली आहे. यावरून संशयित कंपनीतील ‘सॉफ्ट टारगेट’वर लक्ष देऊन त्यांना जाळ्यात ओढायचे, असा प्राथमिक निष्कर्ष पोलीस यंत्रणेकडून काढला जात आहे.
एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत मागील काही वर्षांपासून कार्यरत सहकारी कर्मचाऱ्यांकडून महिलांचा विनयभंग, शारिरीक जवळीक साधण्यासाठी लैंगिक व मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे आणि धर्मातराचा प्रयत्न असे गंभीर प्रकार घडत असल्याचे उघड झाले. महिला लैंगिक शोषणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला आणि कंपनीतील अनेक गैरप्रकार समोर आले.
या संदर्भात आतापर्यंत आठ महिला व एका पुरूषाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एकूण नऊ गुन्हे दाखल केले आहेत. महिलांबरोबर पुरूष कर्मचारीही यामध्ये लक्ष्य ठरले. बहुराष्ट्रीय कंपनीत बैठका, अन्य कार्यक्रम, कामे या धावपळीत संशयितांकडून कामावर नव्याने रुजू झालेले, साधेभोळे, कामापुरता बोलणारे अशा काहींना लक्ष्य केले जात होते.
त्यांना धर्मांतर किंवा शोषणाच्या सापळ्यात अडकवताना त्यांची वैयक्तिक माहिती मिळवली जात होती. त्यांची बलस्थाने आणि ते भावनिकदृष्टया कुठे कमकुवत ठरतात, याचा अंदाज संशयितांकडून घेतला जात होता, असे समोर आले आहे. ज्या युवकाच्या धर्मातराचा प्रयत्न झाला, त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीवरून कंपनीत गैरप्रकार कसे सुरू होते ते समोर आले. तक्रारदार युवक हा सातारा जिल्ह्यातील एका लहान गावातून आलेला होता.
धार्मिक वृत्तीचा. घरापासुन दूर आणि बोलण्याची शैली कॉर्पोरेट विश्वात शोभणारी नसल्याने त्याने स्वत:ला कामांत गुंतवून घेतले होते. भाबड्या युवकाला संशयितांनी लक्ष्य केले. सर्वांशी बोलणे टाळणाऱ्या त्या युवकाला बोलते करण्यासाठी जेवणाच्या सुट्टीत सोबत जेवण्यासाठी आग्रह धरला जात होता. युवक शाकाहारी होता. मात्र संशयित त्याला बळजबरीने सोबत जेवणासाठी बसवायचे.
अनेकदा त्यांच्या जेवणात मांसाहाराचे पदार्थ असल्याने तक्रारदार त्यांच्या सोबत जेवण टाळत होता. त्यामुळे त्याचा डब्बा लपवला जायचा. आपला डब्बा शोधणाऱ्या त्या युवकाला संशयितांनी जेवणात केवळ चव बदल म्हणून मांसाहार पदार्थ खाण्यासाठी दिला. त्याने नकार दिला असता काही धार्मिक संदर्भ देऊन मांसाहार पदार्थ खाण्यासाठी भाग पाडले. हे प्रकार सातत्याने होत राहिले.
जेवनानंतर मद्यपानाच्या पार्ट्यांमध्ये त्याला जबरदस्तीने नेण्यात आले. त्या ठिकाणी त्याच्या श्रध्देला चिथावणी देणारे काही संदर्भ देत एखादा धर्म किती श्रेष्ठ हे त्याला सातत्याने समजावून देण्याचा प्रयत्न झाला. एकाक्षणी त्याच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. मात्र हा दबाव झुगारत या युवकाने पोलिसांकडे दाद मागितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *