समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी परंपरेत आज साठ टक्के प्रतिगामी धर्मांध शक्ती सक्रिय झाल्या आहेत असा खळबळजनक आरोप महाराष्ट्राच्या राजकारणात जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे चाणक्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे समाजात चांगलीच खळबळ उडाली असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
इथे प्रतिगामी आणि धर्मांध म्हणजे शरद पवारांना काय अभिप्रेत आहे हे सर्व सामान्य माणूस जाणतोच. शरद पवार हे एकूणच हिंदू धर्माच्या त्यातही एका विशिष्ट उच्च वर्णीय जातीच्या कायम विरोधात वक्तव्य देखील करतात आणि राजकारण देखील करतात. त्या विशिष्ट जातीबाबतचा त्यांचा आकस त्यांच्या अनेक कृतीतून वेळोवेळी दिसून आलेला आहे. त्यामुळे त्याच आकसापोटी त्यांनी हे विधान केले आहे यात कोणाचेही दुमत होऊ नये.
वस्तूतः महाराष्ट्रात वारकरी परंपरा सुरू झाली तिला मुळातच धार्मिक आधार होता. पंढरीचा विठोबा हे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर आजूबाजूच्या आंध्र कर्नाटक मध्य प्रदेश छत्तीसगड या परिसरातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान राहिलेले आहे. त्यामागे देखील धार्मिक अधिष्ठानच आहे. पायी वारी केली तर पंढरपूरचा पांडुरंग पावतो या श्रद्धेतून ही पायी वारकरी सुरू झाली. मग पायी चालता चालता माणूस थकू नये म्हणून पांडुरंगाचा जयघोष करत टाळ मृदुंग वाजवत डोक्यावर पांडुरंगाला प्रिय असणारी तुळस तिचे वृंदावन डोक्यावर घेऊन नाचत रिंगण घालून महिलांनी इतकेच काय पण पुरुष वारकऱ्यांनी उघड्या फुगड्या झिम्मा खेळत पंढरपूरला मजल दरमजल करत पोहोचायचे. रस्त्यात विश्रांती जिथे असेल तिथे पांडुरंगाचे भजन करायचे आणि कीर्तनकारांनी कीर्तन करायचे हे सर्व रिवाज या वारीत सुरू झाले. धार्मिक अधिष्ठान असल्यामुळेच हे सुरू झाले ना. त्यातूनही भजने कीर्तने आणि प्रवचने यातून सर्वच मान्यवर सामाजिक समरसतेचा संदेश देतच होते ना. आजही ते असा संदेश देतच असतात. फक्त पंढरपूरची वारीच नाही तर गणेशोत्सव दुर्गा उत्सव जन्माष्टमी दहीहंडी असे अनेक धार्मिक उत्सव सामाजिक समरसतेसाठीच आयोजित केलेले. असतात हे वास्तव नाकारता येत नाही.
मात्र हिंदू धर्म हिंदू प्रथा परंपरा यांना कायम प्रतिगामी ठरवून आपण पुरोगामी असल्याचा आभास निर्माण करायचा असा विचार करणारा या देशात एक वर्ग आहे. शरद पवार त्याचे म्होरकेच आहेत असे म्हटल्यास चुकीचे ठरवू नये. त्यातूनच त्यांनी हे विधान केले आहे हे स्पष्ट दिसते आहे.
हिंदू धर्म हा मुळातच सहिष्णुतेचा संदेश देणारा धर्म आहे. इथे सर्वांना सामावून घेण्याची परंपरा अगदी पूराण काळापासून सुरू असलेली दिसून आली आहे. आज करोडो हिंदूंचे दैवत असलेले प्रभू रामचंद्र ज्यावेळी पित्याची आज्ञा पाळण्यासाठी वनवासाला निघाले, त्यावेळी रस्त्यात आदिवासी राजा निषाद याच्याकडे त्यांनी पाहुणचार घेतला होता. नंतर रस्त्यात आडवी येणाऱ्या नदीतून पुढे जायचे तर निषादराच्या राजा आपल्या होळीतून होडीतून प्रभू रामचंद्रांना स्वतः नाव वल्हवीत घेऊन गेला होता याची नोंद रामायणात आहे. रामायणातच दुसरी नोंद अशीही आहे की वनवासाला जाताना शबरी नामक वनात राहणाऱ्या वृद्ध महिलेने श्रद्धेपोटी तोडून ठेवलेली पुष्टी बोरे सुद्धा प्रभू रामचंद्रांनी खाल्ली होती. कृष्णपुराणात देखील सुदामा नमक गरीब मित्राकडे भगवान श्रीकृष्ण स्वतः गेले होते अशी नोंद सापडते. त्याच सोबत श्रीकृष्णाचे सर्व बालपण गाई राखणाऱ्या गुराखी मुलांसोबतच गेले होते अशाही नोंदी आहे. हे बघता या धर्माने कायम सहिष्णुतेचा संदेश दिला आहे हे स्पष्ट होते.
आज या देशात सुरुवातीला जे कोणी होते ते हिंदूच होते. नंतर मुस्लिम या देशात आले आणि त्यांनी तलवारीच्या जोरावर आपला धर्मप्रसार केला. इथे अनेक हिंदूंना त्यांनी बाटवून मुस्लिम केले. तोच प्रकार ख्रिश्चनांनी देखील केला. त्यांनी गोरगरिबांना प्रलोभने दाखवून बळजबरीने ख्रिश्चन केले. मात्र हिंदू धर्मात अशी कोणावरही दबाव टाकून किंवा प्रलोभने दाखवून धर्मप्रसार करण्याची पद्धत कधीच नव्हती, आणि आजही नाही. तरीही पवार हिंदू धर्माला प्रतिगामी म्हणतात हा या शतकातील विनोद म्हणावा लागेल.
जर शरद पवार स्वतःला पुरोगामी म्हणवतात तर मग ते मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे लांगुलचालन का करतात याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. कालच एका वृत्तवाहिनीवर पवार आपल्या घरी मुस्लिमांच्या रमजान महिन्यात इफ्तारची पार्टी आयोजित करतात. त्यांनी दिवाळीचे स्नेह मिलन केले किंवा घरी गणपती बसवून त्यासाठी दहा लोकांना निमंत्रित केले असे कुठे वाचण्यात आलेले नाही. ख्रिस्ती धर्माच्या बाबतही त्यांचे तेच धोरण राहिले आहे. जर तुम्ही स्वतःला पुरोगामी आणि निधर्मी म्हणून तर मग हे अन्य धर्मीयांचे लांगूलचालन तुम्हाला कसे चालते याचेही उत्तर पवारांनी द्यायला हवे.
स्वातंत्र्योत्तर काळात मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधवांचे अवास्तव लाड करायचे आणि त्याचवेळी हिंदूंना कायम दाबून ठेवायचे असे काँग्रेसचे धोरण राहिले आहे. त्यांनी मतांचे राजकारण करण्यासाठी हे उद्योग केले. आज मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज संघटित आहे. त्यामुळे त्यांची गठ्ठा मते मिळवता येतात. हिंदू समाज काही संघटित नाही. त्यामुळे मग काँग्रेसला आणि पर्यायाने शरद पवारांना त्यांची थोडीही परवा राहिली नाही. म्हणूनच ते असे आरोप करू शकतात.
जर पवार स्वतःला पुरोगामी म्हणवतात, तर मग नाशिकमध्ये जो कार्पोरेट जिहादचा प्रकार समोर आला आहे, त्याबाबत ते का बोलत नाहीत. त्यांनी या प्रकाराला सुद्धा विरोध करायला हवा होता. म्हणजेच हिंदूंनी खाल्ले ते शेण, आणि मुस्लिम आणि ख्रिश्चनांनी केली ती श्रावणी, असेच पवारांचे धोरण आहे, असे इथे दिसून येते.
एकूणच पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरून पवारांनी हिंदू धर्मियांवर टीका करण्यातच आयुष्य घालवले आणि आजही तेच करू बघत आहेत. मात्र आता वेळ आली आहे ती त्यांना फक्त लेखणीतून आणि तोंडाने नव्हे तर मतपेटीच्या माध्यमातून उत्तर देण्याची. त्यासाठी देशातील सहिष्णू हिंदूंना एकत्र यावे लागेल आणि काहीसे आक्रमक देखील व्हावे लागेल. तेव्हाच शरद पवारांसारखे असे कथित पुरोगामी गप्प बसतील. अन्यथा त्यांची वळवळ वळवळ सुरूच राहणार आहे हे नक्की.
कालचक्र
अविनाश पाठक
