कुणाल केरकर यांच्या आयर्न पॅराडाईज जिमच्या वतीने शनिवारी सत्कार सोहळा
मुंबई,- राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या रंगमंचावर मुंबईकरांनी पुन्हा एकदा ताकदीचा तडाखा देत प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः चीत केले. “मुंबई म्हणजे बॉडीबिल्डिंगचा बालेकिल्ला” ही ओळख ठणकावून सांगताना मुंबईच्या शरीरसौष्ठवपटूंनी तब्बल १४ पदकांची दणदणीत कमाई करत देशभरात आपला दबदबा प्रस्थापित केला. या झंझावाती यशाच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि नव्या पिढीला प्रेरणेची ठिणगी मिळावी, या उद्देशाने कुणाल केरकर यांच्या संकल्पनेतून आयर्न पॅराडाईज जिमतर्फे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईच्या या दमदार यशाची दखल घेत बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटना यांच्या विद्यमाने हा सोहळा शनिवार, १८ एप्रिल रोजी मालाड (पश्चिम) येथील आयर्न पॅराडाईज येथे रंगणार आहे. या सोहळ्यात केवळ विजेत्यांचा सन्मानच नव्हे, तर मुंबईच्या शरीरसौष्ठव परंपरेचा दिमाखदार गौरव केला जाणार आहे.
गेल्या २५ वर्षांपासून फिटनेस क्षेत्रात भक्कम कामगिरी करणारे कुणाल केरकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना व्यासपीठ मिळावे आणि नवोदितांना प्रेरणा मिळावी, या हेतूने हा उपक्रम उभा केला आहे. या उपक्रमाला संघटनेचे अध्यक्ष नंदू खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, किट्टी फणसेका, विशाल परब, सुनील शेगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भक्कम सहकार्य लाभले आहे. याच मंचावर राष्ट्रीय पदक विजेत्यांसह आयर्न पॅराडाईजसाठी दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही विशेष गौरव केला जाणार आहे.
राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते :
हरमीत सिंग (किताब विजेता), उमेश गुप्ता (उपविजेता), रेखा शिंदे (महिला शरीरसौष्ठव), राजेश तारवे, संदीप सावळे, निलेश दगडे, विश्वंभर राऊळ (क्लासिक शरीरसौष्ठव) नीलेश गुरव (मेन्स फिजिक)
रौप्य पदकविजेते :
गणेश पेडामकर, ओंकार कळके, मनोज बोचरे, विशाल धावडे, अविनाश शिंदे (क्लासिक बॉडीबिल्डिंग) कांस्य पदक विजेता निलेश रेमजे विशेष गौरव प्रशांत घोलम (मुंबई श्री, महाराष्ट्र श्री – सुवर्ण), सिद्धांत यादव (रौप्य) आणि क्षितिज साळुंखे (कांस्य).
