कुमार गट प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धा
मुंबई : राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ हनुमान क्रीडा मंडळ कुर्ला, गौरीशंकर क्रीडा मंडळ कुर्ला आणि कुर्ला क्रीडा केंद्र कुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गांधी मैदानात  आयोजित कुमार गट , प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे बालवीर स्पोर्ट्स क्लब आणि अंबिका सेवा मंडळाने जेतेपदाचा मान मिळवला.
कुमार गटाच्या अंतिम फेरीच्या सामन्यात बालवीर स्पोर्ट्स क्लब चेंबूर यांनी जय भवानी क्रीडा मंडळ घाटकोपर यांचा‌ १४  गुणांनी सहज‌  पराभव केला बालवीर स्पोर्ट्स क्लब कडून साई भोसले यांनी उत्कृष्ट पकडी केल्या तर रोहित सुनार यांनी चौफेर चढाया करत आपल्या संघाला विजयी केले जय भवानीचे   तुषार कांबळे , श्रवण गायकवाड छान खेळले. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून रोहित सुनार यांना रोख रक्कम इंडक्शन गॅस व टि शर्ट देऊन गौरवण्यात आले
उत्कृष्ट पक्कड म्हणून बालवीरच्या साई भोसले  यांना रोख रक्कम टि शर्ट व क्रॉम्प्टन कंपनीचा सिलिंग फॅन देऊन गौरवण्यात आले.  तसेच जय भवानी क्रीडा मंडळाचा तुषार कांबळे यांना उत्कृष्ट चढाई पट्टू म्हणून रोख रक्कम टि शर्ट व क्रॉम्प्टन कंपनीचा मिक्सर देऊन गौरवण्यात आले.
प्रथम श्रेणी पुरुष गटात अंबिका सेवा मंडळाने वीर परशुराम क्रीडा मंडळ घाटकोपरचा चुरशीच्या अंतिम लढतीत ९  गुणांनी पराभव केला. अंबिका सेवा मंडळाकडून शुभम दीडवाघ यांनी अष्टपैलू खेळ करत आपल्या संघाला विजयी केले त्यांला  मानस जाधव याने उत्कृष्ट चढाई करून तर योगेश जगदाळे व यश जगताप यांनी उत्कृष्ट पकडी करून सुरेख साथ दिली. वीर परशुराम कडून आदेश सावंत , वेदांत सावंत चमकले.
सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून शुभम दीडवाघ  त्यांना इंडक्शन गॅस रोख रक्कम टी-शर्ट देऊन गौरवण्यात आले. उत्कृष्ट पक्कड म्हणून अंबिका सेवा मंडळाच्या यश जगताप यांना रोख रक्कम टी-शर्ट आणि क्रॉम्प्टन कंपनीचा पंखा भेट देण्यात आला तसेच उत्कृष्ट चढाई पट्टी म्हणून वीर परशुराम क्रीडा मंडळाच्या आदेश सावंत यांना रोख रक्कम क्रॉम्प्टन चा मिक्सर आणि टी-शर्ट देऊन गौरवण्यात आले. त्या अगोदर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कुमार गटात बालवीरने भानवे अकॅडमीचा तर जय भवानीने महाड तालुका क्रीडा मंडळाचा पराभव केला. पुरुष विभागात अंबिकाने शुर जवानचा तर वीर परशुरामने सागरचा उपांत्य सामन्यात पराभव केला.
सदर स्पर्धेसाठी शर्विल कदम या छोट्या खेळाडू ने प्रत्येक पराभूत संघातील खेळाडूंना स्किपिंग रोप चे वाटप केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रतीक गाढवे कुर्ला क्रीडा केंद्राचे अध्यक्ष, निलेश झंजे उपाध्यक्ष, मनीष मोरे गौरीशंकर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, अमित कांबळे प्रमुख मार्गदर्शक, विश्वास कांबळे हनुमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कमलाकर बने, क्रीडा प्रमुख अविनाश महाडिक यांनी अथक मेहनत घेतली .
०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *