अनिल ठाणेकर
ठाणे: मैदानात उडणारी धूळ, प्रेक्षकांचा चित्कार आणि बॅटमधून सुटलेले ते सणसणीत चौकार-षटकार यांच्या साक्षीत मीरा-भाईंदर शहराच्या क्रीडा इतिहासात एक नवे सुवर्णपान लिहिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप  सरनाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, मीरा-भाईंदर शहरात क्रिकेटचा आतापर्यंतचा सर्वात भव्य उत्सव रंगणार आहे. प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या तर्फे ‘प्रताप सरनाईक प्रीमिअर लीग (PSPL)’ या ऐतिहासिक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, भाईंदर पश्चिम येथे २४ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान पार पडणार असल्याची घोषणा युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली. ही स्पर्धा केवळ एका शहरापुरती मर्यादित नसून, यात संपूर्ण भारताची ‘क्रिकेट क्रेझ’ पाहायला मिळणार आहे.
मीरा-भाईंदर शहरात साकार होणारी ही स्पर्धा केवळ खेळ नसून एक उत्सव आहे. एका बाजूला भारतातील कानाकोपऱ्यातून आलेले १६ दिग्गज ऑल इंडिया संघ आपली ताकद दाखवतील, तर दुसऱ्या बाजूला ठाणे आणि मीरा-भाईंदरमधील १६ स्थानिक संघ आपल्या मातीतील टॅलेंट सिद्ध करतील. या स्पर्धेत एकूण ३२ संघ आपले कसब पणाला लावणार आहेत. ऑल इंडिया टीम्स च्या विजयी संघाला २१ लाख रुपयांचे परितोषिक, रनरअप संघाला ११ लाख रुपयांचे परितोषिक तसेच मॅन ऑफ दि सिरीजला लॅविश चारचाकी गाडी तर बेस्ट बॅटसमॅन, बेस्ट बॉलर आणि इमर्जिंग प्लेअरला शानदार दुचाकी पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे. त्याचप्रकारे ठाणे, मीरा-भाईंदर स्पर्धेतील १६ संघातील विजयी संघाला ५ लाख रुपये पारितोषिक, रनरअपला ३ लाख रुपये पारितोषिक, मॅन ऑफ दि सिरीजला शानदार दुचाकी तर बेस्ट बॅटसमॅन, बेस्ट बॉलर आणि इमर्जिंग प्लेअरला २५ हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त होणार आहे. २४ ते २९ एप्रिल या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान (भाईंदर प.) येथे क्रिकेटचे मैदान ताऱ्यांनी लखलखणार आहे. या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे माजी क्रिकेटपटू आणि बॉलिवूड-मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित कलाकार उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवणार आहेत. यावेळी बोलताना युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक म्हणतात कि, ‘खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ‘प्रेसिडेंट कप’ च्या यशानंतर, आता पीएसपीएलच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना थेट राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे. ही स्पर्धा मीरा-भाईंदरच्या क्रीडा संस्कृतीला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवेल. खेळ रंगणार, रेकॉर्ड हि तुटणार. स्थानिक क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसोबत खेळण्याची आणि आपली जादू दाखविण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. मीरा-भाईंदरच्या क्रीडा इतिहासात ही स्पर्धा सुवर्णअक्षरांनी लिहिली जाईल” असा विश्वास युवसेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला. क्रिकेट रसिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *