शिक्षकांना मिळणार थकबाकी!
मुंबई पालिका प्रशासनाकडून प्रलंबित मागण्या मान्य
मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची जून-जुलैपासून थकबाकी देण्यात येणार आहे. त्याशिवाय गेल्या अनेक वर्षापासून असलेली प्रवास भत्त्याची मागणीही मान्य करण्यात आली असून पुढील महिन्यात याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पालिकेच्या अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात श्रमिक पालिका शाळेतील शिक्षकांना मासिक २,७०० प्रवास भत्ता मिळतो. तर प्राथमिक अनुदानित शाळेतील २,५०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अवघा ६०० रुपये प्रवास भत्ता मिळतो. पण यावर तोडगा निघाला असून महापालिकेने प्रवास भत्ता देण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती कामगार नेते प्रशांत पाटील यांनी दिली.
उत्कर्ष सभा यांच्या पदाधिकाऱ्यांची कामगार नेते प्रसाद लाड, बाबा कदम, भालचंद्र साळवी, प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर, उपायुक्त (शिक्षण) प्राची जांभेकर यांच्या सोबत बैठक पार पडली. या बैठकीत प्रशासनाने काही प्रलंबित मागण्या मान्य केल्या. पालिकेच्या अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग दोन वर्षांपूर्वी लागू करण्यात आला. पण अद्याप सातवा वेतन आयोगाची थकबाकी मिळालेली नाही. मात्र या बैठकीत जून-जुलैपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता देण्याचे मान्य केले आहे.
