मोहिली पंप हाऊसवर महापौर हर्षाली चौधरी यांची सरप्राईज व्हिजिट

– कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची घेतली झाडाझडती

कल्याण : पाणी पुरवठ्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसविण्याचा इशारा केडीएमसी महापौरांनी दिला असून केडीएमसीच्या मोहिली पंप हाऊसवर महापौर हर्षाली चौधरी यांनी सरप्राईज व्हिजिट करत कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.
कल्याण डोंबिवलीकरांच्या घशाला पडलेली कोरड आता प्रशासकीय पातळीवर गंभीर वळण घेत आहे. शहरात वाढत्या पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये संताप असतानाच, महापौर हर्षाली चौधरी यांनी थेट ग्राऊंड झिरोवर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महापौरांनी  ‘अ’ प्रभागातील मोहिली पंप हाऊसवर अचानक भेट देऊन पाहणी केली. कामात होत असलेली दिरंगाई आणि कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा पाहून महापौरांनी अधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले असून, पाण्यासाठी वणवण करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी कडक आदेश दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पाण्याचा प्रश्न उग्र रूप धारण करत आहे. अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणे किंवा पाणीच न मिळणे अशा तक्रारींचा पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर हर्षाली चौधरी यांनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय मोहिली पंप हाऊसला भेट दिली. महापौरांनी जेव्हा पंप हाऊसमध्ये प्रवेश केला, तेव्हा तेथील यंत्रणा आणि कामाची संथ गती पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी संबंधित अभियंता आणि कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून तांत्रिक अडचणी समजून घेतल्या.
मात्र, तांत्रिक कारणांपेक्षा मानवी दिरंगाईमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे दिसून आल्यावर महापौरांनी आक्रमक पवित्रा घेतला.पाहणी दरम्यान महापौरांनी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली: यावेळी कामचुकारपणा खपवून घेणार नाही: कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. याबरोबर कोणत्या प्रभागात किती पाणी जाते आणि कुठे कमतरता आहे, याचे चोख नियोजन सादर करण्याचे आदेश दिले. तसेच पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर येऊ देऊ नका  अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
ंनागरिक पाण्यासाठी त्रस्त असताना प्रशासन ढिम्म राहू शकत नाही. मोहिली पंप हाऊस हे शहराच्या पाणीपुरवठ्याचे हृदय आहे, तिथेच जर कामात दिरंगाई होत असेल तर ते सहन केले जाणार नाही. जनतेला पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि तो मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे सागितले. महापौरांच्या या धडक कारवाईमुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात मोठी खळबळ उडाली आहे. आता या भेटीनंतर तरी कल्याण-डोंबिवलीतील नळांना पाणी वेळेवर आणि पुरेशा दाबाने येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *