कल्याण : छत्रपती संभाजीनगर महापालिकेची इमारत ही कब्रस्तानच्या जागेवर बांधलेली असल्याने तिथे ‘आत्मे’ दिसतात आणि त्यामुळे पालिका कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण असून काम करणे कठीण जात आहे, असा अत्यंत अविवेकी, अवैज्ञानिक, धक्कादायक दावा महाराष्ट्रचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.
ज्या सामाजिक न्याय विभागाने भारतात पहिला असा जादूटोणा विरोधी कायदा पारित करून घेतला, त्याच विभागाचे मंत्री त्याच कायद्याची मूल्ये पायदळी तुडवणारी, लोकांमध्ये अंधश्रद्धा वाढवणारी, भय निर्माण करणारी विधाने करतात हे देशातील प्रगत मानल्या गेलेल्या महाराष्ट्र राज्याचा आणि संत-समाज सुधारकांचा अवमान करणारे आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संजय शिरसाट यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करीत आहे. जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीत मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे खीळ बसू शकते. त्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहत नाही. म्हणून महा. अंनिस त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
महापालिकेची ही कथित आत्म्यांचे वास्तव्य असलेली इमारत या मंत्र्यांना काम करण्यायोग्य वाटत नसेल तर ती पाडण्याऐवजी अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे हस्तांतरित करावी. आम्ही त्या जागेत व्यवस्थित सामाजिक कामे करून, विविध उपक्रम करून दाखवू असे समितीने सांगितले आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेबाबत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी केलेले विधान हे पूर्णपणे अविवेकी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला हरताळ फासणारे आहे.
