एका रात्रीत १५ वाहनांवर कारवाई

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत काल जिल्हाधिकारी स्वतः मैदानात उतरल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत बेकायदा वाळू वाहतूक करणारे 1५ डंपर पकडण्यात आले. हे ऑपरेशन काल एका रात्रीत पार पडले. काल रात्रीपासून सुरु झालेली ही धडक मोहीम पहाटेपर्यंत सुरु होती. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि निवासी उप -जिल्हाधिकारी मच्छिन्द्र सुकटे   यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने समन्वय साधत ही व्यापक मोहीम राबवली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट निर्देशानुसार त्या त्या   तालुक्यांतील तहसिलदारांनी संयुक्त पथके तयार करून अवैध वाळू वाहतुकीवर एकाचवेळी अनेक ठिकाणी धडक कारवाई केली. या मोहिमेत सावंतवाडीचे तहसिलदार श्रीधर पाटील, वैभववाडीचे तहसिलदार सूर्यकांत पाटील, कणकवलीचे तहसिलदार दीक्षांत देशपांडे, मालवणचे तहसिलदार गणेश लव्हे, वेंगुर्ल्याचे तहसिलदार ओंकार ओतारी तसेच कुडाळचे तहसिलदार सचिन पाटील यांचा सक्रिय सहभाग होता.
कारवाई दरम्यान विविध मार्गांवर वेगवेगळ्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत अवैध वाहतुकीला आळा घातला.  आचरा–कणकवली मार्गावर वैभववाडी पथकाने २ वाहने ताब्यात घेतली, तर देवलीमार्गे परुळे दिशेने जाणाऱ्या ३ वाहनांवर वेंगुर्ल्याच्या  पथकाने कारवाई केली. कुंभारमाठ येथे कणकवली पथकाने ३ वाहने पकडली, तोंडवली येथे सावंतवाडी पथकाने ३ वाहनांवर कारवाई केली, तर कुडाळ परिसरात कुडाळ पथकाने ४ वाहने ताब्यात घेतली. अशा प्रकारे विविध ठिकाणी समन्वयाने करण्यात आलेल्या कारवाईत एकूण १५ वाहने जप्त करण्यात आली असून ती संबंधित तहसील कार्यालयांच्या आवारात ठेवण्यात आली आहेत. संबंधितांवर पुढील दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी रात्री झाराप परिसरात भेट देत कारवाईचा आढावा घेतला.रात्रभर चाललेल्या या मोहिमेत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे अनेक अवैध वाळू व्यावसायिकांना आपल्या वाहनातील वाळू टाकून पळ काढावा लागला, तर काहींच्या बोटी खाडी पात्रातच अडकून पडल्या.  प्रशासनाच्या या निर्णायक पावलामुळे अवैध वाळू उपसा व वाहतुकीला कायम स्वरूपी आळा बसेल की ही कारवाई एक उपचार ठरते हे आता पहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *