आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
महिलांच्या गटात श्रीराम, धर्मवीर, स्वस्तिक संघांचे विजय
मुंबई, दि. १९ (क्री.प्र.)-कबड्डी संघ आणि कबड्डीपटूंना लाखमोलाचा पुरस्कार देणार्या क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांच्या संयोजनाखाली सुरु झालेल्या आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुरुषांच्या व्यावसायिक गटात आयएसपीएल, सीजीएसटी, मुंबई पोर्ट ट्रस्ट संघांनी खणखणीत विजयाची नोंद केली तर महिलांच्या राज्यस्तरिय कबड्डी स्पर्धेत श्रीराम (पालघर), धर्मवीर (नंदुरबार) आणि स्वस्तिक कबड्डी संघांनी दणदणीत विजयासह जबरदस्त सलामी दिली.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजन कबड्डीच्या मॅटसंग्रामाचे विक्रोळी पूर्वेला टागोर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारलेल्या क्रीडानगरीत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन पार पडले. यावेळी क्रीडाप्रेमी आमदार व संयोजक सुनील राऊत, माजी आमदार रमेश कोरगावकर, बाबा कदम, दीपक सावंत, विश्वास शिंदे, महिला विभाग प्रमुख रश्मी पहुडकर तसेच मुंबई उपनगर कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष सुधाकर घाग उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि मुंबई उपनगर कबड्डी संघटना यांच्या मान्यतेने श्रीमान योगी प्रतिष्ठान आयोजित या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बहुतांश लढती एकतर्फीच झाल्या. इन्शुअरकोट स्पोर्ट्स प्रा.लि.(आयएसपीएल) संघाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत रूपाली ज्वेलर्सचा ६०-२१ असा धुव्वा उडवला. शिवम गोरडे, आदेश वरखडे आणि गिरीराज सिंह यांच्या तुफानी चढाया व अचूक पकडींमुळे मध्यंतरालाच ३२-१० अशी आघाडी घेत सामना एकतर्फी केला.दुसर्या सामन्यात सीजीएसटीने हिंदुजा रुग्णालयावर ५६-१७ असा एकतर्फी विजय मिळवत आपला आक्रमक अंदाज दाखवला. मुंबई पोर्ट ट्रस्टनेही मुंबई महानगरपालिकेवर ३८-२१ अशी सहज मात करत स्पर्धेत दमदार सुरुवात केली.
महिलांच्या राज्यस्तरीय लढतीतही संघांनी जोरदार खेळ सादर केला. होतकरू मित्र मंडळ आणि कर्नाळा स्पोर्ट्स क्लब यांच्यातील सामना मात्र खर्या अर्थाने रंगला. सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या होतकरू संघाने मध्यंतरानंतर जबरदस्त पुनरागमन करत २७-२५ असा थरारक विजय मिळवला. पालघरच्या श्रीराम संघाने स्नेहविकास संघावर ४४-१३ असा दणदणीत विजय मिळवला, तर नंदुरबारच्या धर्मवीर संघाने जय भारतचा ४४-१६ असा पराभव करत प्रभावी सलामी दिली. स्वस्तिक महिला संघाने पुण्याच्या पतंगराव कदम संघावर २०-११ अशी मात करत आपला ठसा उमटवला.
