शिळफाटा ते साबेगावात कामांची सुरुवात
दिवा- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. २९ मधील शिळ फाटा- महापे- ठाकूर पाडा डोंगराळ भागातील काच गल्ली ते शिळफाटा येथील मोठ्या नाल्यापर्यंत नालेसफाई कामाला आज प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. तसेच साबेगाव परिसरातील अनेक वर्षांपासून तुंबलेले गटारही कर्मचाऱ्यांच्या मदतीने साफ करण्यात आले. या कामाच्या शुभारंभ प्रसंगी नगरसेवक बाबाजी बाळाराम पाटील, नगरसेविका अर्चना निलेश पाटील, बाळाराम पाटील, सावन ठाकूर, अरिफ कुमार, स्थानिक रहिवासी तसेच महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.
यापूर्वी नगरसेवक बाबाजी पाटील, प्रभागातील लोकप्रतिनिधी, महापौर आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दोन दिवसांत नालेसफाई सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्या आश्वासनानुसार आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
प्रभागातील इतर अनेक ठिकाणीही टप्प्याटप्प्याने नालेसफाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी आणि पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. प्रशासनाच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.
