नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.१२० या शाळेचा विद्यार्थी अमोघ बनसोडे याची इंग्लड मध्ये डेव्हॉन येथे होणा-या सीड्स ऑफ पीस इंटरनॅशनल कॅम्प २०२६ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १५ मधील विद्यार्थिनी शिफा अन्सारी तसेच नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक ३१ मधील विद्यार्थिनी श्रेया कांबळे आणि जान्हवी गायकवाड या तिघींनी ‘ए आय च्या सहाय्याने स्तन कर्करोग शोध (Breast Cancer using AI)’ या प्रकल्पासाठी राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक संपादन केलेला असून ह्या विद्यार्थिनी जकार्ता, इंडोनेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
अशा आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी मुंबईचा नावलौकिक वाढविणा-या नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील ४ विद्यार्थ्यांचा नवी मुंबई महानगरपालिका सर्वसाधारण सभेत महापौर सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते सभागृहाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील, सभागृह नेते सागर नाईक, विरोधी पक्षनेते विजय चौगुले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांचे शिक्षक आणि पालकही उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.१२० या शाळेचा इयत्ता दहावीतील विद्यार्थी अमोघ बनसोडे याची इंग्लड मध्ये डेव्हॉन येथे होणा-या सीड्स ऑफ पीस इंटरनॅशनल कॅम्प २०२६ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर नेतृत्व, संवादकौशल्य व शांतता प्रस्थापनेविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे. १८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत इंग्लंड येथे आयोजित आंतरराष्ट्रीय शिबिरात अमोघ भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या कार्यक्रमासाठी देशातील १३ राज्यांमधून ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. कठोर निवड प्रक्रियेनंतर अंतिम १७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये अमोघ बनसोडे याने स्थान मिळविले आहे.
त्याचप्रमाणे ‘कोडेवर ७.०’ ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), कोडिंग आणि रोबोटिक्स या विषयांवरील आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये नमुंमपा शाळा क्र. १५ मधील विद्यार्थिनी शिफा अन्सारी तसेच नमुंमपा शाळा क्र. ३१ मधील विद्यार्थिनी श्रेया कांबळे आणि जान्हवी गायकवाड यांनी ‘ए आय च्या सहाय्याने स्तन कर्करोग शोध (Breast Cancer using AI)’ या प्रकल्पासाठी राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक संपादन केलेला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थी ॲमेझॉन आणि लर्निंग लिंक्स फाऊंडेशन यांच्या सहयोगाने राबविण्यात येणाऱ्या थिंक बिग स्पेस कार्यक्रमांतर्गत एआय, रोबोटिक्स आणि कोडिंगचे शिक्षण घेतात. दि. ८ मार्च रोजी मुंबई येथे आयोजित कोडेवर राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण १५ समुह (४५ विद्यार्थी) यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध शाळांमधील २०० हून अधिक संघ सहभागी होते. यापैकी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील ३ समुहांनी १२ एप्रिल रोजी बेंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली, जिथे १२ पेक्षा अधिक राज्यांतील सर्वोत्तम संघांनी सहभाग घेतला होता.
त्यामध्ये शिफा अन्सारी तसेच श्रेया कांबळे आणि जान्हवी गायकवाड या तीन विद्यार्थिनींच्या समुहाने नी ‘ए आय च्या सहाय्याने स्तन कर्करोग शोध (Breast Cancer using AI)’ या प्रकल्पासाठी राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक संपादन केलेला असून, त्यांनी उत्कृष्ट नाविन्यपूर्ण आणि तांत्रिक कौशल्याचे प्रदर्शन केले आहे. या विद्यार्थिनी १६ आणि १७ मे रोजी जकार्ता, इंडोनेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या चारही विद्यार्थ्यांचे हे यश नवी मुंबई महानगरपालिकेसाठी अभिमानास्पद असून, त्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांस महापालिका सर्वसाधारण सभेत समस्त लोकप्रतिनिधींच्या उपस्थित सन्मान करून गौरविण्यात आले व पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
