भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्याकडून प्रशासनाचे आभार

ठाणे, दि. २० (प्रतिनिधी) : राज्यातील आमदारांना व मुंबईतील नगरसेवकांना देण्यात येत असलेल्या `बॅच’प्रमाणे ठाण्यातील नगरसेवकांना महापालिकेचा लोगो असलेला `बॅच’चे आज वाटप करण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी सर्व नगरसेवकांना बॅच देण्याची महासभेत प्रस्तावाद्वारे मागणी केली होती.
ठाणे महापालिकेत अनेक नगरसेवक पहिल्यांदा निवडून आले आहेत. त्यांना प्रशासकीय कामकाजात सुविधा व्हावी, त्यांच्याबाबत प्रशासनाला माहिती व्हावी, यासाठी बॅच देण्याबाबत मागणीचा प्रस्ताव भरत चव्हाण यांनी सादर केला होता. तर ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी अनुमोदन दिले होते.
विधीमंडळ व मंत्रालयात प्रवेशाबरोबरच प्रशासकीय कामकाजात सुविधा व्हावी, यासाठी आमदारांना विधीमंडळाचा लोगो असलेले बॅच सादर केले जातात. मुंबई महापालिकेकडून नगरसेवकांना बॅच उपलब्ध केला जातो. त्यानुसार ठाणे महापालिकेतील सर्व नगरसेवकांना बॅच उपलब्ध करावे, असा प्रस्ताव भरत चव्हाण यांनी सादर केला. त्याला महापौरांनी मंजूरी दिली. त्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आज उपस्थित नगरसेवकांना बॅचचे वाटप करण्यात आले. या निर्णयाबद्दल नगरसेवक भरत चव्हाण यांनी महापौर व प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *