जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे निर्देश
अशोक गायकवाड
अलिबाग: रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मान्सून काळात येणाऱ्या पाऊस, पूर, वीज तसेच अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे. आपत्ती काळात सर्व यंत्रणानी सतर्क व दक्ष रहावे, तसेच मान्सून पूर्व तयारी करताना सर्व बाबींची काटेकोरपणे तपासणी आणि उपाययोजना करावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जावळे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, भारतीय तटरक्षक दलाचे अभिषेक कुमार, आपत्ती व्यवस्थापन अधिकार सागर पाठक उपस्थित होते. जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, पावसाळा सुरु होण्याकरिता एक महिन्याचा कालावधी बाकी असून सर्व शासकीय यंत्रणानी अतिधोकादायक व धोक्याची संभावना असलेल्या ठिकाणांची पाहणी करावी. या ठिकाणच्या नागरिकांना मान्सून कालावधीमध्ये सुरक्षित जागी स्थलांतरीत करता यावे यासाठी निवाऱ्याची सज्जता करावी. आपत्ती काळात आपदामित्रांचे सहकार्य खूप महत्वाचे असून ते तात्काळ मदतीला धावून येवून महत्वाची भूमिका बजावत असतात. याकरिता आपदा मित्र हे रायगड जिल्ह्याला लाभलेले एक वरदानच आहे. प्रत्येक विभागांनी आपला नियंत्रण कक्ष २४x७ कार्यान्वित ठेवावा. याकरिता एक समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. जलसंपदा विभागाने आपल्या अखत्यारित असलेली धरणे, मध्यम प्रकल्पांची तपासणी करावी. आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा औषधसाठा, व्हॅक्शीन उपलब्ध ठेवाव्यात. आपत्तीकाळात रोगराई पसरणार नाही याची दक्षता घ्यावी. विविध विभागांचे परिपूर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडे जिल्हा प्रशासनास पाठविण्यात यावेत. तसेच रायगड पाटबंधारे विभागाने धरणांची तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अतिवृष्टी विचारात घेवून टप्प्या-टप्प्याने धरणांतून विसर्ग करावा अशा सूचनाही जावळे यांनी केल्या. जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, तसेच या काळात पूर्व परवानगी शिवाय कुणीही मुख्यालय सोडू नये असे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले. दरड प्रवण गावांकरिता नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी गावातील लोकांच्या संपर्कात राहिले पाहिजे. आम्ही तुम्ही एक आहोत या भावनेने सर्वांनी काम करावे. आपणास काही मदत हवी असल्यास याकरिता आम्ही सदैव तत्पर आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक पूलांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती तात्काळ करावी व पर्यायी मार्ग सुस्थितीत ठेवावेत. तसेच रस्त्यावरील खडे, साईडपट्टी भरुन घेणे, रस्त्यावरील ब्लिंकर्स, बोर्ड, डायव्हर्शनचे बोर्ड, ब्लॅक स्पॉटवर रिफ्लेक्टर्स बसवावेत. सर्व विभागांकडील शोध व बचाव साहित्यांची दुरुस्ती करून सर्व साहित्य सुस्थितीत राहील, याची दक्षता घ्यावी. आवश्यक शोध व बचाव पथक, रुग्णवाहिका, स्थलांतराचे ठिकाण, अन्न पाण्याची व्यवस्था, जेसीबी मशिन्स, वूड कटर्स, बोट, लाईफ जॅकेट, स्पीड बोट, जनरेटर इ. साहित्य व मनुष्यबळ सर्व विभागांनी सज्ज ठेवावेत, असे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले. तसेच या काळात उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी व तहसीलदार यांनी उत्तम समन्वय राखत काम करावे. नगरपालिका, महानगरपालिकांनी नालेसफाईची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करावीत. तसेच महाड शहरात दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते. अशा पूरपरिस्थितीत मदत कार्य व बचावासाठी आवश्यक पूर्वतयारी व उपाययोजना केली जावी. आपत्तीच्या प्रसंगी रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग आदी विभागांनी देखील नागरिकांच्या मदत व सुरक्षेच्या दृष्टीने पूर्वतयारी करावी. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले म्हणाल्या की, ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवक व सरपंच यांनी समन्वयाने आढावा बैठका घेवून त्याप्रमाणे नियोजन करावे. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी केले. या बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यासह एन डी आर एफ, होमगार्डा,महावितरण, सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक परिवहन अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे अधिकारी यासह विविध शासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
