ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य समन्वयक व शिवसेना महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण विष्णु नाकती यांच्या अध्यक्षतेखाली “लाडक्या सुनेचं रक्षण – हेच शिवसेनेचे वचन!” या ब्रीद वाक्याखाली ‘लाडकी सुन’ अभियानांतर्गत प्रभाग क्र. २१ मध्ये महिला पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले.

बैठकीदरम्यान महिलांशी थेट संवाद साधत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अभियानाचे उद्दिष्ट, कार्यपद्धती आणि संघटनेची भूमिका याबाबत सविस्तर माहिती अभियानाचे कायदेविषयक सल्लागार ॲड. हेमंत महाले यांनी दिली. “समतेचा, सन्मानाचा आणि प्रेमाचा संदेश” देणारे हे अभियान असून, सून ही घरातील मुलगीच असल्याची भावना समाजात रुजवणे, तिच्या सन्मान व सुरक्षिततेची हमी देणे आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणे हा या उपक्रमाचा गाभा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अभियानाच्या उद्दिष्टांमध्ये महिलांवरील अत्याचारांची ओळख करून त्यांना कायदेशीर मदत पुरवणे, त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे, पीडित महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे तसेच त्यांना मानसिक व नैतिक आधार देणे यांचा समावेश आहे.  “घरगुती हिंसा हा गुन्हा आहे, कौटुंबिक विषय नाही” हा संदेश समाजात रुजवणे आणि सून-सासू यांच्यातील नातेसंबंध अधिक सन्मानपूर्वक व सुदृढ करणे हेही अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

महिलांचा सन्मान, त्यांचे हक्क आणि सशक्तीकरण यासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध असल्याचे सौ. मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी नमूद केले. तसेच हे अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन किरण नाकती यांनी केले.

यावेळी किरण नाकती यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या ‘नौपाडा संपर्क कक्ष’चे उद्घाटन सौ. मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास माजी ज्येष्ठ नगरसेवक भास्कर पाटील, अपर्णा वाडदेकर, मेघना वेहेले तसेच नौपाडा विभागातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अभियानाच्या माध्यमातून “सून ही लेकीसारखीच आहे, तिला सन्मानाने वागवा” असा संदेश देत सुरक्षित व सुदृढ समाज निर्मितीसाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.

अडचणीत असलेल्या महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक ८८२८८६२२८८/ ८८२८८९२२८८ जाहीर करण्यात आले. यावर महिलांनी संपर्क साधल्यास त्वरित मदत पुरवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *