राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा ड प्रभाग कार्यालयावर धडक; अन्यायकारक कारवाई थांबवण्याची मागणी
कल्याण :
राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या वतीने आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या ड प्रभाग कार्यालयावर भव्य ‘रापी मोर्चा’ काढण्यात आला. गटई कामगारांवर होत असलेल्या तोडक आणि अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ हा जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
या मोर्चाचे नेतृत्व दलित मित्र ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे यांनी केले. माजी नगरसेवक भिमराव डोळस, ठाणे जिल्हाध्यक्ष राम बनसोडे, देवचंदजी अंबाडे, सुमेध हुमणे, हनुमंत गायकवाड, गजेंद्र राऊत, मनोज वाघमारे, धुराजी इंगळे, केवल मोविया, मनोज मंडराई, रामचंद्र ढोरे, कविता रुपवते, लता लांडगे, इंदराबाई वाघमारे, मंदाबाई बनसोडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समाजबांधव सहभागी झाले होते.
मोर्चादरम्यान आंदोलकांनी आरोप केला की, गटई कामगारांकडे अधिकृत परवाने असूनही ‘फेरीवाला हटाव’ मोहिमेअंतर्गत त्यांच्यावर अन्यायकारक कारवाई केली जात आहे. बेकायदेशीर नोटिसा व जाहीर आवाहनांद्वारे त्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला.
संविधानाने संरक्षित असलेला गटई कामगार वर्ग हा फेरीवाला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्पष्ट असूनही महानगरपालिकेकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई होत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर गटई कामगारांचे हक्क अबाधित ठेवावेत, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.
