गोरगरिबांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश; संबंधितांवर गुन्हे दाखल होणार
मीरा-भाईंदर :
प्रताप सरनाईक यांनी भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी (टेंबा) रुग्णालय येथे अचानक पाहणी करत आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवले. या पाहणीदरम्यान तब्बल १ कोटी ६५ लाख रुपयांच्या एक्स्पायरीच्या उंबरठ्यावर असलेल्या औषधांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
दररोज ५०० ते ६०० रुग्ण उपचारासाठी येणाऱ्या आणि २५० खाट क्षमतेच्या या महत्त्वाच्या रुग्णालयात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. याचवेळी ‘सक्षम फाउंडेशन’मार्फत रुग्णालयात जबरदस्तीने निकामी होणारी औषधे आणण्याचा प्रकार समोर आला. “गोरगरीबांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना तुरुंगात पाठवणारच,” असा इशारा देत त्यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
२७ मार्च २०२६ रोजी ‘सक्षम फाउंडेशन’मार्फत रुग्णालयाला देण्यात आलेल्या औषधांची एक्सपायरी तारीख ३० मार्च असल्याचे तपासात निष्पन्न झाले. म्हणजेच अवघ्या ४८ तासांचा कालावधी शिल्लक असताना ही औषधे रुग्णालयात आणण्यात आली होती. विशेष म्हणजे ही औषधे रुग्णालयाने मागितलेलीही नव्हती. डॉक्टर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या औषधांचा वापर टाळण्यात आला आणि संबंधित फाउंडेशनला अधिकृत पत्र देण्यात आले, त्यामुळे संभाव्य धोका टळला.
या प्रकरणात काही लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आणि दबावाखाली हा प्रकार घडल्याचा आरोपही समोर आला आहे. संबंधित कार्यक्रमावेळी आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील उपस्थित होते. उपमहापौरांच्या ओळखीच्या फाउंडेशनमार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची गंभीर दखल घेत सरनाईक यांनी PWD विभागामार्फत रुग्णालयाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून पंचनामा करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची माहिती त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनाही दिली आहे.
“रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. प्रसिद्धीसाठी एक्सपायरीच्या उंबरठ्यावर असलेली औषधे देणे हा घृणास्पद प्रकार आहे. दोषींवर कठोर कारवाई होणारच,” असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
या पाहणीवेळी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, रुग्णालय व्यवस्थापक जाफर तडवी, PWD अधिकारी तसेच डॉक्टर आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या कारवाईमुळे रुग्णालयातील त्रुटी समोर आल्या असून भविष्यात आरोग्य सेवांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
