सावंतवाडी(प्रतिनिधी)- सावंतवाडी शहर आणि आसपासच्या गावांना काल मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला. वीजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या  पावसाने लोकांची झोप उडवून दिली. या भागात मोठ्या प्रमाणावर पडझड होऊन वित्तहानी झाली आहे सुदैवाने जीवितहानी हानी झाली नसल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. शहरात तसेच आसपासच्या गावांमध्ये मध्यरात्रीची वेळ असल्याने लोक गाढ झोपेत होते. रस्त्यावर रहदारी नसल्याने आणि सर्वत्र शुकशुकाट असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही नसल्याची माहिती प्रशानाकडून प्राप्त झाली आहे.

या वादळाचा सर्वाधिक फटका श्री पंचम खेमराज (एसपीके) महाविद्यालयाला बसला आहे.यावेळी वाऱ्याचा वेग इतका जबरदस्त होता की महाविद्यालयाच्या जुन्या इमारतींचे कौलारू छत पूर्णपणे कोसळले तर नवीन इमारतीवरील लोखंडी पत्रे कागदासारखे हवेत उडून दूरवर फेकले गेले काही पत्रे तर उडून आजूबाजूच्या तीन मजली इमारती ओलांडून कॉलेजच्या मागील बाजूस जाऊन पडले इतका वाऱ्याचा वेग होता. त्याशिवाय शहरातील मुख्य शॉपिंग कॉम्प्लेक्स असलेल्या ‘रामेश्वर प्लाझा’ इमारतीचे पत्रे उडून थेट एस.पी.के कॉलेजच्या परिसरात जाऊन पडले. या इमारतीच्या काचेच्या खिडक्या फुटून मोठ्या प्रमाणावर  आर्थिक नुकसान झाले आहे.

या वादळामुळे शहराच्या इतर भागातही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राजवाडा परिसरातील नारळाची झाडे उन्मळून पडली आहेत तसेच राजवाड्याच्या संरक्षक कठड्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिव उद्यानातील अनेक झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. उभा बाजार परिसर आणि आरपीडी हायस्कुल  परिसरात कांही घरांवरील पत्रे उडाले आहेत तसेच जाहिरातीच्या कमानीही कोसळल्या आहेत.

खबरदारीचे उपाय म्हणून तसेच तांत्रिक बिघाडामुळे शहराचा विद्युत पुरवठा काही तासांसाठी खंडित करण्यात आला होता.त्यामुळे शहरात व आसपासच्या गावांमध्ये काळोखाचे साम्राज्य पसरले होते. काल सकाळपासून आपत्कालीन व्यवस्थापन महसूल यंत्रणा तसेच नगरपालिका प्रशासनातर्फे रस्त्यावरील झाडे हटवण्याचे आणि जनजीवन पूर्ण पदावर आणण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.  काल संध्याकाळी तसेच मध्यरात्री सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस, कलंबिस्त व सातूळी, रोणापाल, तिरोडा, मडुरा, इन्सुली, आजगाव आदी गावात वादळी वाऱ्यासहा पाऊस कोसळला. कुडाळ तालुक्यातील नारूर, चाफेली व गोठोस या गावांमध्येही पाऊस झालेला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे, मातोंड, शिरोडा व म्हापण या गावांमध्ये पाऊस पडल्याचे वृत्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *