प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
दिवा : दिवा – मुंब्रा सीमेवर असलेले शिळफाटा तसेच भारत गिअर्स उड्डाणपुलाखाली सुरू असलेल्या अनधिकृत पार्किंग, लोखंडी केबिनच्या अतिक्रमणा विरोधात समाजसेवक विनोद वास्कर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व्हॉट्सॲपद्वारे तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीची प्रशासनाने दखल घेत तक्रार क्रमांक २६०३२२५ नोंदवला असून, संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण पाठवण्यात आल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. “आपली निवेदन/तक्रार संबंधित विभागाकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे. सदर तक्रारीवरील कार्यवाहीबाबत अहवाल प्राप्त होताच आपणांस अवगत करण्यात येईल,” असे लेखी उत्तर तक्रारदारास देण्यात आले आहे.
शिळफाटा उड्डाणपुलाखाली NHAI च्या नियमानुसार कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण किंवा वाहन पार्किंग करण्यास परवानगी नसतानाही येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग व लोखंडी केबिन उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तेथे रोजच्या रोज मोठ्या लक्झरी बसेस, ट्रक, रिक्षा, टुरिस्ट गाड्या, चार चाकी आणि दु चाकी वाहने उभी असल्यामुळे वाहतूक व सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशासन प्रत्यक्षात कारवाई करते का, अतिक्रमण हटवले जाते का, याकडे आता शिळ- डायघर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. “प्रशासनाने तक्रार क्रमांक देऊन सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता संबंधित विभाग उड्डाणपुलाखालील अनधिकृत पार्किंग व केबिनबाबत काय भूमिका घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे,” अशी प्रतिक्रिया समाजसेवक विनोद वास्कर यांनी दिली.
