आरती परब
दिवा : दिवा शहरात वाढत्या शहरीकरणामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक घटकाने जबाबदारी उचलण्याची गरज असल्याचे मत शिवसेना नगरसेवक ऍड. आदेश भगत यांनी व्यक्त केले आहे. यासाठी शहरातील लहान- मोठ्या दुकानदारांनी आपल्या दुकानात कचरापेटी (डस्टबीन) ठेवणे बंधनकारक करावे, अशी मागणी त्यांनी दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिवा शहर हे पंचक्रोशीतील गावांसाठी प्रमुख बाजारपेठ बनले असून येथे खरेदीदारांची मोठी वर्दळ असते. वाढत्या ग्राहकसंख्येमुळे शहरात अनेक दुकाने, हॉटेल्स, स्नॅक्स कॉर्नर तसेच गोडाऊन्स उभारण्यात आले आहेत. मात्र बहुतांश दुकानांमध्ये कचरापेटीची व्यवस्था नसल्याने ग्राहकांकडून तसेच व्यापाऱ्यांकडून निर्माण होणारा कचरा थेट रस्त्यावर फेकला जात असल्याने अस्वच्छतेची समस्या अधिक गंभीर होत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
“स्वच्छतेची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून शहरातील प्रत्येक नागरिक आणि व्यापाऱ्याची आहे. दुकानदारांनी आपल्या दुकानात छोटी कचरापेटी ठेवली तर ग्राहक रस्त्यावर कचरा टाकण्याऐवजी त्याचा योग्य वापर करतील,” असे ऍड. आदेश भगत यांनी सांगितले.
तसेच, अनेक ठिकाणी रस्त्यांवर तसेच इमारतींच्या मागील भागात कचरा टाकण्याचे प्रकार वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. “नागरिकांनीही उपलब्ध कचरापेटीचाच वापर करून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य केले, तर ‘स्वच्छ दिवा, सुंदर दिवा’ हे स्वप्न नक्कीच साकार होऊ शकते,” असेही त्यांनी म्हटले आहे.
