कामगार मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन!
राज भंडारी
पनवेल: आमदार विक्रांत पाटील यांच्या मागणीनुसार रायगड जिल्ह्यातील नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांना न्याय मिळावा तसेच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, या मागणीसंदर्भात कामगार मंत्री ना. आकाशजी फुंडकर यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक ऑनलाइन स्वरूपात पार पडली.
रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ हे शासनाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेले मंडळ असून त्याच्या कार्यक्षेत्रात पनवेल व संपूर्ण रायगड जिल्हा परिसराचा समावेश होतो. मात्र, या कार्यक्षेत्रात बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याने रायगड जिल्ह्यात नोंदणीकृत तरुणांवर अन्याय होत आहे व यामुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याची बाब आमदार विक्रांत पाटील यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली.
रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडे ३००० हुन अधिक नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांची प्रतीक्षा यादी असून ५ वर्षांहून अधिक कालावधी उलटूनही अद्याप त्यांना रोजगार उपलब्ध झालेला नाही व यासाठी अधिकाऱ्यांची उदासीन मानसिकता कारणीभूत असल्याचे आमदार विक्रांत पाटील यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
रायगड जिल्ह्यात हजारो कंपन्या व इतर आस्थापना असताना बोर्डाकडे केवळ  सुमारे  २५० आस्थापनाच नोंदीत आहेत व इतर आस्थापना खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सी कडून सुरक्षा रक्षक घेत आहेत हे नियमबाह्य असून सर्व कंपन्या व आस्थापना बोर्डाकडे नोंदीत होणे अपेक्षित आहे व नोंदीत नसल्यास त्यांनी किमान अधिकृत सूट प्राप्त सुरक्षा रक्षक एजन्सीकडून सुरक्षा रक्षक घेणे बंधनकारक आहे. मात्र असे होताना दिसत नाही व अधिकारी या सर्वांना पाठीशी घालत असल्याचे आमदार विक्रांत पाटील यांनी बैठकीमध्ये निदर्शनास आणून दिले.
याविषयात जास्तीत जास्त आस्थापना बोर्डाकडे नोंदीत व्हाव्यात यासाठी तात्काळ मेगाड्राईव्ह घेण्यात यावा व जास्तीत जास्त प्रतीक्षा यादीतील तरुण नोकरीला लागावेत यासाठी कार्यवाही करण्यात यावी ही मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी आक्रमकपणे केली. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी मेगाड्राईव्ह विषयात तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देऊन एक महिन्यात जास्तीत जास्त आस्थापना नोंदीत होणे व प्रतिक्षा यादीतील तरुणांना नोकऱ्या देणे याविषयात परिणामकारक काम करावे व अहवाल सादर करावा अशा सूचना दिल्या.
बैठकीतील या सकारात्मक चर्चेमुळे रायगड सुरक्षा रक्षक प्रतीक्षा यादीतील युवांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या बैठकीत कामगार मा.मंत्री आकाश फुंडकर व कामगार विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *