ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कोलशेत परिसरात अवैधरित्या डेब्रीचे डम्पिंग करणाऱ्या वाहनांवर आज कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान संबंधित वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल ६०हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कोलशेत परिसरात काही वाहनांकडून अनधिकृतपणे डेब्री टाकण्यात येत असल्याची माहिती महानगरपालिकेला प्राप्त झाली होती. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाने संबंधित ठिकाणी पाहणी करून कारवाई केली. अवैध डम्पिंगमुळे परिसराच्या स्वच्छतेवर तसेच पर्यावरणावर परिणाम होत असल्याने ही कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, अभियंता किशोर गुळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक साईराज कांबळे, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक चारु गोटे, स्वच्छता निरीक्षक सुमित जाधव यांनी केली.
यावेळी जप्त करण्यात आलेले डेब्री पुढील प्रक्रिया करण्यासाठी अधिकृत प्रकल्पाकडे पाठवण्यात आले. तसेच शहरात अवैधरित्या डेब्री टाकणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला.
०००००००
