अथक प्रयत्नांनंतर मृतदेह काढला बाहेर
कल्याण : कल्याणनजीक  काळू नदीत आंघोळीला गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली, मात्र मुलाचा शोध लागला नव्हता. अखेर दुसऱ्या दिवशी अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनंतर त्याचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. मृत मुलाची ओळख अटाळी कोळीवाडा येथील ऋषभ रवींद्र राणे अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ सोमवारी सायंकाळी आपल्या तीन मित्रांसोबत कालू नदीकाठी आंघोळीसाठी गेला होता. यावेळी अचानक त्याचा पाय घसरल्याने तो खोल पाण्यात गेला आणि नदीच्या प्रवाहात वाहू लागला.
ऋषभला बुडताना पाहून त्याचा एक मित्र त्याला वाचवण्यासाठी नदीत उतरला. मात्र तोही पाण्याच्या प्रवाहात अडकला. किनाऱ्यावर उभ्या असलेल्या इतर दोन मित्रांनी प्रसंगावधान राखत त्या मुलाला सुरक्षित बाहेर काढले, मात्र ऋषभचा काहीच मागमूस लागला नाही. मित्रांनी जवळपास अर्धा तास नदीत शोध घेतला. मात्र यश न आल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कल्याण पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली.
कल्याण अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले की, सोमवारी उशिरापर्यंत सुरू असलेल्या शोधमोहीमेत मुलाचा शोध लागला नाही. त्यानंतर मंगळवारी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली आणि मोठ्या प्रयत्नांनंतर ऋषभचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला.
ऋषभ हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. तो घरातून हात-पाय धुवून येतो असे सांगून मित्रांसोबत नदीकाठी गेला होता. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कल्याण पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *