मुंबई: मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशनच्यावतीने व रोटरी क्लब ऑफ बोरिवली यांच्या सहकार्याने एम सी एफ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बोरिवली ( पश्चिम ), येथे संपन्न झालेल्या ११ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुण्याकडून खेळणाऱ्या माजी विश्व् विजेता खेळाडू योगेश परदेशी याने आपल्या वयाच्या ५१ व्या वर्षी प्रदीर्घ काळाने मुंबईच्या फार्मात असलेल्या आंतर राष्ट्रीय विजेत्या महम्मद घुफ्रानवर १९-१४ व २५-१५ अशी सहज मात करत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले. उपांत्य फेरीत त्याने सध्या फार्मात असलेल्या मुंबईच्या प्रशांत मोरेवर २५-२०, २५-० असा सरळ एकतर्फी विजय मिळवल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. तोच आत्मविश्वास अंतिम सामन्यात त्याने दाखवला व इंडियन ऑईलमध्ये काम करत असलेल्या आपल्या सहकार्यावरही आपले वर्चस्व सिद्ध केले. दुसरीकडे अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी घुफ्रानने माजी विश्व् विजेत्या जळगावच्या संदीप दिवेवर २३-९, २५-२१ असा सरळ दोन सेटमध्ये विजय संपादन केला होता. या गटात तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत संदीप दिवे सरस ठरला. त्याने प्रशांतचा १७-९, २५-४ असा धुव्वा उडवला. या गटात मुंबईच्या निलांश चिपळूणकर व ओंकार टिळक या दोन उदयोन्मुख खेळाडूंनी उपउपांत्य फेरीत प्रवेश करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
महिला एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात रत्नागिरी कडून खेळणाऱ्या आंतर राष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदमला विजयासाठी तीन सेटपर्यंत झुंजावे लागले. ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकर विरुद्ध पहिला सेट ती २-२४ असा एकतर्फी हरली होती. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या सेट तिने आपले सर्वस्व पणाला लावत २१-१५ व २१-१५ असा जिंकला. आकांक्षाने उपांत्य फेरीत मिताली पाठकवर १४-१२, ४-१९ व २१-१८ असा निसटता विजय संपादन केला होता. तर समृद्धीलाही अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी मुंबईच्या सोनाली कुमारी विरुद्ध १८-२०, २१-६ व २४-८ असे झगडावे लागले होते. या गटाच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मितालीने सोनालीवर २५-११, १६-१६ असा सरळ विजय मिळवला.
विजेत्या खेळाडूंना रोटरी टी आर एफ चे विश्वस्थ डॉ भरत पंड्या, रोटरी क्लब ऑफ बोरिवली डिस्ट्रिक्ट ३१४१ च्या अध्यक्षा केरळ तापीवाला व सेक्रेटरी जैनीशा संपत, मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशनचे सह खजिनदार सी ए नितीन मजिठीया, क्रीडा विभागाचे सह सचिव राकेश मोदी, कार्यकारिणी सदस्य हेमल शाह व हेमंत आशर व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिके व चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कॅरम व बुद्धिबळ विभागाचे समन्वयक महर्षी देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.
