अशोक समेळ, वारे गुरुजी, कोकरे
युआरएल पुरस्काराचे मानकरी
२९ मे रोजी ‘कृतज्ञता दिवस’ निमित्त पुरस्कार वितरण सोहळा
मुंबई : विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी यूआरएल फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कृतज्ञता दिवस’ पुरस्कार सोहळ्यात यंदा ज्येष्ठ कादंबरीकार व अभिनेते अशोक समेळ, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते वारे गुरुजी आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत शांताराम मामा कोकरे यांना गौरविण्यात येणार आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दि. २९ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता माटूंगा (पश्चिम), मुंबई येथील यशवंत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.
यूआरएल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष  उदयदादा राजारामशेठ लाड यांच्या ८४ व्या वर्षात पदार्पणानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे.
यूआरएल फाउंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार अंतर्गत समाजसेवक वारे गुरुजी (शिक्षणतज्ज्ञ) आणि शांताराम मामा कोकरे (वनस्पती तज्ज्ञ व पर्यावरण रक्षक) यांना प्रत्येकी एक लाख रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच यूआरएल फाउंडेशन साहित्य गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार आणि अभिनेते अशोक समेळ यांना प्रदान करण्यात येणार असून या पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये व सन्मानचिन्ह असे आहे, अशी माहीती युआरएल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उदय दादा लाड यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध अभिनेते सुमीत राघवन आणि प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात ‘हास्य-धारा’ कवी संमेलनाचेही आयोजन करण्यात आले असून रामदास फुटाणेंसहीत विविध मान्यवर कवी त्यात सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमासाठी उपस्थितांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू न आणण्याचे आवाहन आयोजकांनी केले असून वाहनतळाची सुविधा उपलब्ध असल्याचे यूआरएल फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *