कोट्यावधींचा पाटबंधारे घोटाळा उघड, तात्काळ निलंबनाची मागणी!
राजीव चंदने
मुरबाड : मुरबाड पंचायत समितीच्या लघु पाटबंधारे विभागात ‘महाभ्रष्टाचार’ उघड झालाय आणि या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आहेत पुन्हा तेच वादग्रस्त नाव उपअभियंता जगदिश बनकरी. तालुक्यासाठी आलेल्या कोट्यावधींच्या निधीवर बनकरी आणि त्यांच्या शाखा अभियंत्यांनी थेट दरोडाच टाकलाय. कागदावर सिमेंट-काँक्रीटची उच्च दर्जाची कामं, पण प्रत्यक्षात? फक्त दगड-गोट्यांचा भरणा! आणि बिलं मात्र लाखोंची उचलली… ही शासनाची फसवणूक नाही तर जनतेच्या घामाच्या पैशाची खुलेआम लूट आहे!
हा पहिलाच प्रकार नसून बोगस कामं, निधीचा अपहार, मोर्चे, उपोषणं… बनकरी यांचं नाव नेहमीच चर्चेत असतं. पण प्रत्येक वेळी ‘वरिष्ठांच्या आशीर्वादाने’ ते सहीसलामत सुटतात. मुरबाडकर विचारतायत – बनकरींना वाचवणारं ते ‘अदृश्य हात’ कुणाचे? यावर्षीही बनकरींच्या कृपेने बोगस कामांचा सपाटा सुरूच आहे. कार्यालयात शेकडो तक्रारींचा ढीग लागलाय. मात्र आता नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. बनकरीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात लवकरच बेमुदत उपोषण छेडण्यात येणार असून त्याचं पत्र पंचायत समितीत धडकलं. वरिष्ठांचा आशीर्वाद’ म्हणजे नेमकं कोण? यावेळी बनकरी वाचले तर रस्त्यावर उतरून मंत्रालय हलवू असा कडक इशाराच आता जबाबदार नागरिकांनी दिलाय.
