ठाणे : जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका, शेल्टर असोसिएट्स संस्था आणि म्यूज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य नगर येथील राजे शिवाजी शाळेत “मासिका महोत्सव” आयोजित करण्यात आला. मासिक पाळी विषयी समाजामध्ये असलेल्या अंधश्रद्धा, गैरसमज आणि लज्जेची भावना दूर करून महिलांमध्ये व पुरुषांमध्ये योग्य जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम पार पडला.
या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सभागृह नेते तथा स्थानिक नगरसेवक हनुमंत जगदाळे, महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे जयंत घाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.
शेल्टर असोसिएट्स संस्था मागील अनेक वर्षांपासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांमध्ये “एक शौचालय” प्रकल्प तसेच विविध स्वच्छता अभियान राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक मासिक पाळी दिनाचे औचित्य साधून गुरूवारी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमामध्ये मासिक पाळी विषयक गाणी, व्याख्याने, प्रश्नोत्तरे, खेळ तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांद्वारे उपस्थित नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ विजयकुमार कट्टी यांनी मासिक पाळी संदर्भातील समाजातील अंधश्रद्धा व गैरसमज यांवर मार्गदर्शन केले. त्यांनी युज अँड थ्रो सॅनिटरी पॅडमुळे पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देत पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन केले.
तसेच उपस्थित महिला व पुरुषांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या मनातील शंका आणि गैरसमज दूर करण्यात आले. शेल्टर असोसिएट्सचे प्रकल्प व्यवस्थापक अमोल गाडे यांनी संस्थेच्या मासिक पाळी स्वच्छता प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, ठाण्यातील विविध वस्त्यांमधील जवळपास 2000 महिलांनी मेंस्ट्रुअल कपचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिनमुळे होणारा कचरा कमी झाला असून महिलांचे आरोग्य सुधारण्यास तसेच आर्थिक बचत होण्यास मदत झाली आहे.
“मासिक पाळी हा लपवण्याचा विषय नसून त्यावर उघडपणे चर्चा करून योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे,” असे मत अमोल गाडे यांनी व्यक्त केले. म्यूज फाउंडेशनचे निशांत बांगेरा यांनीही कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट करत सहभागी झालेल्यांचे अभिनंदन केले.
यावेळी संस्थेचे वैभव काळे, सुनिता सकुंडे, योगिता शिंदे, मनिषा सुर्वे आणि पूजा भालेराव आदी उपस्थित होते. जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “मासिका महोत्सवा”मध्ये लोकमान्य नगर परिसरातील महिला व पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
0000000000
