मुंबई : साहित्य संवर्धक, समाजसेवक आणि बृहन्मुंबई गुजराती समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हेमराजभाई शाह यांच्या प्रेरणेने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या चार प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. साहित्य, संशोधन आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात.
डॉ. हेमराज शाह यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी असून त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित कादंबरी, हिंदी व इंग्रजी माहितीपट तसेच नाटक समाजासमोर आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक किशोर व्यास यांनी त्यांच्या जीवनावर आधारित कादंबरी लिहिली आहे. तर अहमदाबादच्या प्रख्यात लेखिका, दिग्दर्शिका आणि निर्माती मनीषा शर्मा यांनी त्यांच्या जीवनावर आधारित हिंदी आणि इंग्रजी माहितीपटांची निर्मिती केली आहे. यापैकी हिंदी माहितीपटाला नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘बेस्ट फिल्म अवॉर्ड’ मिळाला आहे. प्रख्यात नाट्यदिग्दर्शक व लेखक वसंत मारू यांनी डॉ. शाह यांच्या जीवनावर आधारित ‘हेमूदादा’ हे नाटक रंगभूमीवर आणले असून या नाटकाच्या प्रयोगांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
गुजराती विश्वकोशतर्फे कवी नर्मद यांच्या जयंतीनिमित्त २४ ऑगस्ट रोजी दिला जाणारा ‘वीर नर्मद साहित्य पुरस्कार’ यंदाही प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी ३१ हजार रुपयांची रोख रक्कम देण्यात येणार असून ज्येष्ठ साहित्यिक कुमारपाळ देसाई यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाईल.
याशिवाय, सौराष्ट्र ट्रस्टच्या ‘कच्छ मित्र’ दैनिकाचे व्यवस्थापकीय विश्वस्त हार्दिक मामणिया यांच्या हस्ते ‘कवी दुलेराय काराणी पुरस्कार’ (३१ हजार रुपये), ‘अखंड आनंद’चे पी. के. लहेरी यांच्या हस्ते ‘डॉ. हेमराज शाह अखंड आनंद पुरस्कार’ (१० हजार रुपये) तसेच विश्वभारतीच्या उषाबेन उपाध्याय यांच्या हस्ते संशोधन क्षेत्रातील पीएच.डी. विद्यार्थ्यांसाठी ‘विश्वभारती-हेमराज शाह पुरस्कार’ (५ हजार रुपये) प्रदान करण्यात येणार आहे. साहित्य, संशोधन आणि सांस्कृतिक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी हे चार पुरस्कार दिले जात असून साहित्य क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्याचा हा उपक्रम असल्याचे डॉ. हेमराज शाह यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *