आमदार निलेश राणे यांचा थेट आरोप..! दोडामार्ग-गांजाचे ग्रीन कॉरिडोर…!
सिंधुदुर्ग : (राजन चव्हाण )– जिल्ह्यातील अनैतिक धंदे वाढण्यास जिल्हा पोलीस अधिक्षक मोहन दहीकर हेच जबाबदार असून अशा भ्रष्ट,निष्क्रिय अधिकाऱ्याची जिल्ह्यातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी जाहीर मागणी शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी आज येथे एका भरगच्च पत्रकार परिषदेत केली.
अगदी अलिकडेच राणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत जिल्ह्यातील मटका,जुगार, बेकायदा दारू धंदे, बनावट दारू वाहतूक, अमंली पदार्थांची वाहतूक आदी सर्व प्रकारचे अनैतिक धंदे फोफावण्यास सिंधुदुर्गचे पोलीस अधिक्षक मोहन दहीकर हेच  जबाबदार असून त्यांच्याच आशीर्वादाने  हे सर्व सुरू आहे असा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपानंतर जिल्ह्यातील पोलीस दलात आणि अनैतिक धंदेवाल्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
आमदार निलेश राणे हे आज सकाळी ११ वा.जिल्हा मुख्यालयातील पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेणार असे काल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र एकच चर्चेचा विषय होता आणि तो म्हणजे आजच्या पत्रकार परिषदेत  जिल्हा पोलीस यंत्रणेवर विशेष करून पोलीस अधिकक्षकांवर राणे  कोणता ‘बॉम्ब’ टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
जिल्हा पोलीस अधिक्षक दहीकर यांच्या गेल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाच आहे  शिवाय जिल्ह्यातील अनैतिक धंदेही मोठ्या प्रमाणावर वाढले आणि पोलीस खाते भ्रष्टाचाराने बरबटले असा थेट आरोप राणे यांनी केला. जिल्ह्यातील अनैतिक धंदेवाल्यांकडून दरमहा किमान सव्वा दोन ते अडीच कोटी रुपये इतका किमान ‘हप्ता’ जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला जातो असा खळबळजनक आरोपही राणे यांनी यावेळी केला. हा आकडा जास्तही असू शकतो असे सांगून राणे  म्हणाले, बीट हवलदार, संबंधित पोलीस ठाणे, ‘एलसीबी’ आणि पोलीस अधिक्षक अशी ही थेट साखळी असून याच माध्यमातून हा हप्ता दरमहा गोळा केला जातो.
लवकरच आपण जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, गृह खाते सांभाळणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या नजरेस आणणार असल्याचे सांगून असा भ्रष्ट, निष्क्रिय, बेजबाबदार अधिकारी पोलीस सेवेतही असता नये असे आपले मत असल्याचे राणे म्हणाले.
राणे यांनी दहीकर यांच्या दीड वर्षाच्या कार्यकाळातील पोलीस यंत्रणेच्या गैरकारभराचे अनेक दाखले देत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून अनैतिक धंदेवाले, गुन्हेगार, यांना आता पोलिसांचा धाकच उरला नाही असा आरोप केला.
याच कालावधीत जिल्ह्यात सुमारे ११०० ते १२०० गुन्ह्यांची नोंद झाली मात्र त्यापैकी २० टक्केच गुन्ह्यांमध्ये आरोपी दोषी ठरले. ‘दोषसिद्धी’चा हा दर लक्षात घेतला तर ८० टक्के गुन्ह्यांमध्ये पोलिसांकडून भ्रष्ट मार्गाने तडजोडी केल्या जात असल्याचा आरोप राणे यांनी यावेळी केला.
गोव्यातून मुंबईकडे व राज्याच्या अन्य भागात होणाऱ्या अनधिकृत दारू वाहतुकी विरुद्ध सिंधुदुर्ग पोलिसांनी किती कारवाई केली याबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती देण्यात टाळाटाळ करण्यात आली मात्र गेल्या दीड वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात किती दारू पकडली आणि त्याची किंमत काय याची आकडेवारीच राणे यांनी जाहीर करून पोलिसांच्या आशीर्वादानेच ही दारू सिंधुदुर्गातून पुढे गेली असा आरोप राणे यांनी केला.
गोव्यात जवळपास दररोज गांजा नेमका कुठून येतो हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता मात्र या प्रश्नाचे धक्कादायक उत्तर आज राणे यांनीच दिले त्यांच्या म्हणण्यानुसार दोडामार तालुक्यात रबर लागवडीच्या नावाखाल शेकडो हेक्टर जमिनीवर गांजाची बेकायदा शेती केली जात आहे. हे पोलिसांना दिसत नाही का..? त्यांनी काय कारवाई केली याचे उत्तर मिळाले पाहिजे अशी मागणी राणे यांनी केली  दरम्यान दहीकर हे गेले आठ दिवस प्रशिक्षणासाठी बाहेर असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *