आरती परब
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील मुला-मुलींसाठी आणि खेळाडूंसाठी महत्त्वाचे मानले जाणारे रेल्वे ग्राऊंड वाचवण्यासाठी आज भाजप आणि शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडून मैदानाच्या काही भागात बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत स्थानिक खेळाडू आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
डोंबिवली पश्चिमेतील मोठ्या मैदानांपैकी एक असलेल्या या रेल्वे ग्राऊंडवर दररोज शेकडो युवक-युवती विविध खेळांचा सराव करतात. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या प्रस्तावित बांधकामामुळे मैदानाची जागा कमी होऊन खेळाडूंना अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर आज रेल्वे मैदानात स्थानिक तरुण, खेळाडू आणि नागरिकांसह भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन छेडले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत मैदानावरील बांधकाम तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली. तसेच रेल्वे अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा होईपर्यंत कोणतेही काम सुरू करू नये, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
आंदोलनानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी बैठकीपर्यंत काम स्थगित ठेवण्याचे मान्य केल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. त्यामुळे डोंबिवलीतील खेळाडूंना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, नगरसेविका, विविध पदाधिकारी तसेच शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मैदानाच्या संरक्षणासाठी पुढील काळातही लढा सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *