राजीव चंदने
मुरबाड : सार्वजनिक बांधकाम विभाग व केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू असलेले कल्याण-माळशेज राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ चे काँक्रीटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र रस्ता पूर्ण होताच या मार्गावर टोल वसुली सुरू होणार असल्याने मुरबाडकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या मार्गावर धावणाऱ्या एसटी बस, काळी-पिवळी टॅक्सी, व खाजगी खासगी चारचाकी वाहनांसह सर्वच वाहनांना टोल भरावा लागणार आहे. यामुळे कल्याणकडे जाणाऱ्या सर्वच वाहनांचे भाडे वाढणार असून त्याचा थेट आर्थिक फटका सामान्य प्रवाशांना बसणार आहे लोकमित्र रमेश हिंदुराव यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. “वास्तविक रस्त्याच्या कामाचे संपूर्ण देयक ठेकेदाराला अदा करण्यात आलेले असताना पुन्हा जनतेकडून टोल वसूल करणे अन्यायकारक आहे. काँक्रीटचा रस्ता करून सामान्य जनतेचे हित नेमके काय साधले, हेच कळत नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“मुरबाड तालुक्यातील नागरिकांना या टोलमधून पूर्णपणे मुक्त करावे,” अशी ठाम मागणी रमेश हिंदुराव यांनी केली आहे. तसेच हा प्रश्न केवळ एका पक्षाचा नसून सर्वसामान्य जनतेचा आहे, त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून एकत्र येत या अन्यायाविरोधात लढा उभारावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. काँक्रीट रस्त्यामुळे प्रवास सुखकर होईल हे खरे, पण त्यासाठी रोजच्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार असेल तर हा विकास कुणासाठी, असा प्रश्न आता मुरबाडकर विचारत आहेत.
