भाजप नेते माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला विश्वास
कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १३४ व्या भागाचे सामूहिक श्रवण रविवारी कल्याण पश्चिमेतील बेतुरकर पाडा परिसरात उत्साहात पार पडले. भाजप नगरसेविका हेमलता पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रतिष्ठीत सामाजिक संस्थांच्या प्रमुख, सामान्य नागरिक, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार आणि नगरसेविका हेमलता नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम झाल्यानंतर भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपला संकल्प व्यक्त केला. गेल्या वर्षीच्या महिला दिनाच्या निमित्ताने आपण सुरू केलेल्या महिला स्वसंरक्षणाच्या लाठी-काठी प्रशिक्षण उपक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमध्ये दखल घेतील असा विश्वास यावेळी भाजप नेते नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमामध्ये विद्यार्थिनींचा सहभाग वाढवण्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या व्यक्तींना केले.
यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, नगरसेविका हेमलता नरेंद्र पवार यांच्यासह प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय कल्याण केंद्राच्या प्रमुख अलका दीदी, श्री संत गजानन शेगांव भक्त मंडळ कल्याण विश्वस्त गणेश खैरनार, नितिन चौधरी, मयुरेश आगलावे, रवी गुप्ता, शत्रुघ्न भोईर, डॉ.सुनिल हरपाले, ॲड.समृद्ध ताडमारे, रोहीत लांबतुरे, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संवादातून देशातील सकारात्मक बदल, सामाजिक उपक्रम, क्रीडा क्षेत्रातील यश तसेच पर्यावरण संवर्धन यावर भर दिला. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करत पारंपरिक भारतीय पेयांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. आंबा पन्हे, ताक, सोलकढी, कोकम सरबत यांसारखी पारंपरिक पेये शरीरासाठी फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.
