वडील बंधू संदेश मोकाशी यांनी कथन केली अंगावर शहारे आणणारी हकीकत
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ झुंझार पत्रकार अभय मोकाशी यांचे २ मे रोजी पोटाच्या कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ उत्तर मुंबई पत्रकार संघातर्फे मुंबई वैश्य समाजाच्या सदडेकर सभागृहात आयोजित शोकसभेत त्यांच्या जीवनातील संघर्षमय प्रवासाला उजाळा देण्यात आला. यावेळी अभय मोकाशी यांचे वडील बंधू संदेश मोकाशी यांनी त्यांच्या आजारपणातील हृदयस्पर्शी अनुभव कथन करत उपस्थितांना भावूक केले.
“अभय मोकाशी यांचे गुणगान आणि गौरव अनेकांनी केला, याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत दिलेला लढा हा अधिक प्रेरणादायी आहे. कर्करोगाशी झुंज देताना ते तब्बल ७० दिवस अन्न-पाण्याविना राहिले. दोन दिवस अन्न-पाणी न मिळाल्यास माणसाची काय अवस्था होते, याची कल्पना प्रत्येकाला आहे. अशा परिस्थितीतही त्यांनी आत्मसंयम, योगसाधना आणि सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवला. त्यांच्या विचारांचा आणि जीवनमूल्यांचा वारसा जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे संदेश मोकाशी यांनी सांगितले.
उत्तर मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक घोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शोकसभेत संदेश मोकाशी यांनी अभय मोकाशी यांच्या जीवनातून सत्याचा आग्रह, कुटुंबाप्रती बांधिलकी, स्नेहभाव आणि लढवय्येपणा हे महत्त्वाचे संदेश मिळतात, असे नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात विनायक घोडे यांनी दूरदर्शनवरील चर्चांमध्ये अभय मोकाशी यांच्या परखड आणि निर्भीड व्यक्तिमत्त्वाचा परिचय झाल्याच्या आठवणी जागवल्या. ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर, प्रसाद मोकाशी, शुभांगी सारस्वत, अक्षरभेटचे संपादक सुभाष सूर्यवंशी, प्रगती खांबिया आदींनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
ज्येष्ठ पत्रकार विजय तारी यांनी अभय मोकाशी यांच्या स्मृतींना उजाळा देत ‘ॐ पूर्णमदः पूर्णमिदं…’ या शांतीमंत्राने आदरांजली अर्पण केली. यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली.
अभय मोकाशी यांचे निकटवर्तीय आणि युनायटेड नेशन्सचे पीस ॲम्बेसेडर डिप्लोमॅट डॉ. प्रवीण भाटिया यांनी सांगितले की, युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी फॉर ग्लोबल पीस (यूएसए) या संस्थेतर्फे अभय मोकाशी यांना ग्लोबल पीससाठी मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली होती. तसेच साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी, सेंट्रल कौन्सिल ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन आणि होली एंजल्स कॉलेज ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. अभय मोकाशी उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार’ सुरू करण्यात येणार असून या पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया उत्तर मुंबई पत्रकार संघाकडून केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
यावेळी भाजपच्या उत्तर मुंबई प्रसिद्धी प्रमुख नीलाबेन सोनी यांनीही अभय मोकाशी यांना श्रद्धांजली वाहिली. शोकसभेस संदेश मोकाशी यांच्या स्नुषा सोनल गौरव मोकाशी, संघाचे सरचिटणीस प्रवीण वराडकर, प्रियेन पुरेचा, विजय परब, दिनेश सावंत, युवा पत्रकार अनुष्का अनिलकुमार, नीलम पाटील, हर्षल खाडे, राजेश शाह, सत्यवान ताठरे यांच्यासह अनेक पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते.
