जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा बाजार समित्यांना इशारा
हरिभाऊ लाखे
नाशिक : कांद्यासाठी १,५८० रुपये क्विंटलचा दर निश्चित झाल्यानंतरही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदी केंद्रांबाबत शेतकऱ्यांना योग्य माहिती दिली जात नसल्याची बाब समोर येत असून, त्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. प्रत्येक नाफेडच्या खरेदी केंद्रासह बाजार समितीने कांदा खरेदी केंद्राची योग्य माहिती देणारा फलक, त्यावरच कांद्याचा दर आणि खरेदी केंद्राकडे जाणारे फलक दर्शनी भागात लावावेत, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. कांद्याच्या मागील महिन्यात गडगडलेल्या भावामुळे बळीराजाला मोठा फटका बसला. कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी आंदोलनेही झाली. त्याचे सर्वाधिक पडसाद नाशिक, लासलगाव, निफाडमध्ये उमटले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्ह्यात येऊन आंदोलन केले. त्यानंतर शासनाने दखल घेत, कांद्याला १,५८० रुपयांचा दर निश्चित करीत नाफेडद्वारे त्याची खरेदीही सुरू केली. अशातच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही त्यातील बारीकसारीक बाबी शोधून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर अंमलबजावणी प्रक्रिया सुरू झाली. त्यात प्राधान्याने नाफेडचे केंद्र तसेच बाजार समितीत कांदा खरेदी केंद्र कुठे आहे,
याची माहितीच शेतकऱ्यांना दिली जात नसल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर आता जिल्हाधिकारी प्रसाद यांनी प्रत्येक खरेदी केंद्राकडे जाणारा मार्ग दर्शविण्याचे, स्पष्ट फलक अन् त्यावर कांद्याच्या दरांची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. पथके कांद्याच्या लागवडीपासून, साठवणूक व माहिती, विक्रीतील घोळ, घोटाळा अन् फसवणूक यावर नियंत्रणासाठी आता कृषी, पणन आणि महसूल विभागाचे एकत्रित पथक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तालुका स्तरावर कार्यरत आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी आपली कुठलीही अडचण, समस्या या पथकांकडे मांडावी. त्यावर त्यांना योग्य तो सल्ला अन् मार्गदर्शन केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.
0000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *