मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे अमृत महोत्सवी क्रीडापटू गोविंदराव मोहिते ट्रॉफी १६ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेस १ जून रोजी प्रारंभ होत असून विविध जिल्ह्यातील ३२ खेळाडूंमध्ये चूरस राहील. परेल येथील आरएमएमएस सभागृहात पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा नील म्हात्रे विरुध्द मायकल हायस्कूल-कुर्ल्याचा निखील भोसले यामधील उद्घाटनीय लढत क्रीडाप्रेमी गोविंदराव मोहिते, निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, शिवाजी काळे, विलास डांगे आदींच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय खेळाडूंना डीएसओ कॅरम स्पर्धेच्या तयारीसाठी सरावात्मक विनाशुल्क स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेतेपदाच्या दावेदारीसाठी न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत, पोद्दार हायस्कूल-मालाडचा प्रसन्न गोळे व पुष्कर गोळे, कळसुलकर इंग्लिश स्कूल-सावंतवाडीचा भरत सावंत, ठाकूर रामनारायण पब्लिक स्कूल-दहिसरचा तीर्थ ठाकर, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा देविका जोशी, महात्मा गांधी विद्यामंदिर-वांद्रेची तनया दळवी, कनोसा हायस्कूल-कांदिवलीची वेदिका पोमेंडकर आदी शालेय कॅरमपटू सर्वांगसुंदर खेळ करण्यासाठी सज्ज आहेत. चॅम्पियन कॅरम बोर्डवर ही स्पर्धा रंगणार असून पहिल्या आठ विजेत्या-उपविजेत्यांना स्ट्रायकरसह आकर्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
