फरार आरोपी हुजैफा दिल्ली स्पेशल सेलच्या जाळ्यात
मिरा -भाईंदर
महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने संयुक्त कारवाई करत मीरा-भाईंदर परिसरातून फरार दहशतवादी आरोपी हुजैफा याला अटक केली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये करण्यात आलेल्या अटक आणि चौकशीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, हुजैफा हा कथितरित्या सैयद मुदस्सिर हुसेन उर्फ मुन्ना झिंगाडा यांच्या संपर्कात होता. मुन्ना झिंगाडाचा संबंध दाऊद इब्राहिम टोळीशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, तो या मॉड्यूलच्या कारवायांना मार्गदर्शन करत असल्याचा आरोप आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील वांद्रे परिसरातील रेल्वे जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईनंतर निर्माण झालेल्या तणावाचा फायदा घेत तरुणांना भडकवून बेकायदेशीर व दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करण्याचा कट रचला जात होता. या कटाचे संचालन पाकिस्तानातील कराची येथून होत असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.
हुजैफावर मुंबईत स्थानिक नेटवर्क उभारणे आणि कारवायांसाठी आर्थिक व्यवस्था करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तपासादरम्यान त्याला या नेटवर्ककडून सुमारे एक लाख रुपये मिळाल्याचे समोर आले आहे. तसेच काही तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क करून कामाच्या बदल्यात पैसे देण्याचे आमिष दाखवण्यात येत असल्याची माहितीही उघड झाली आहे.
या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेले तौकीर आणि साजिद शेख यांना अनुक्रमे कुर्ला आणि मुंब्रा येथून ताब्यात घेण्यात आले होते. दोघेही अमली पदार्थांच्या व्यसनाधीन असून सहज पैसा मिळविण्याच्या लालसेपोटी या नेटवर्कच्या संपर्कात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, अंडरवर्ल्ड गँगस्टर मुन्ना झिंगाडाचा निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या हुजैफाला बुधवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याच्या ट्रान्झिट रिमांडची मागणी केली असून पुढील चौकशीसाठी त्याला दिल्लीला नेण्याची तयारी सुरू आहे. सध्या तपास यंत्रणा संपूर्ण नेटवर्क, त्याचे आर्थिक स्रोत आणि कथित दहशतवादी कारवायांशी असलेले संबंध यांचा सखोल तपास करत आहेत.
0000000
