अस्मि राऊत व यश शिंदे ‘बेस्ट पिचर’, तर आर्या चव्हाण ‘बेस्ट कॅचर’
ठाणे : भुवनेश्वर येथील प्रसिद्ध किट युनिव्हर्सिटीच्या मैदानावर पार पडलेल्या ३१ व्या राष्ट्रीय सब- ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या मानाच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने दिमाखात सुवर्णपदक पटकावले, तर मुलांच्या संघाने उपविजेतेपद मिळवत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. २४ मे ते २९ मे या कालावधीत ही स्पर्धा पार पडली.
संघीय यशासोबतच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या वैयक्तिक कौशल्याने संपूर्ण स्पर्धकांचे लक्ष वेधून घेतले.
अस्मि राऊत (मुलींचा संघ): स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘बेस्ट पिचर ऑफ द टूर्नामेंट’ (Best Pitcher).
यश शिंदे (मुलांचा संघ): मुलांच्या गटात उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत ‘बेस्ट पिचर ऑफ द टूर्नामेंट’ (Best Pitcher) चा बहुमान पटकावला.
आर्या चव्हाण (मुलींचा संघ): उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘बेस्ट कॅचर ऑफ द टूर्नामेंट’ (Best Catcher).
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंच्या मार्गदर्शनाचा फायदा
दोन्ही संघांना राष्ट्रीय पातळीवर सज्ज करण्यासाठी महाराष्ट्राच्या तज्ज्ञ आणि अनुभवी प्रशिक्षकांनी घेतलेली मेहनत अत्यंत मोलाची ठरली. मुलींच्या संघाला लाभलेल्या प्रशिक्षक आरती भगत आणि रिया आगवणे या दोन्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहेत. तर मुलांच्या संघाचे प्रशिक्षक सोमनाथ सपकाळ आणि धनंजय शिरसाट हे स्वतः राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू आहेत. या दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंच्या मार्गदर्शनामुळे व रणनीतीमुळेच महाराष्ट्राच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत दिमाखात मजल मारत हे घवघवीत यश संपादन केले.
अध्यक्ष डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून कौतुक
महाराष्ट्र बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि सचिव राजेंद्र इखणकर यांनी दोन्ही संघांच्या या अभूतपूर्व कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.
“महाराष्ट्राच्या मुला- मुलींनी राष्ट्रीय पातळीवर राज्याचा नावलौकिक वाढवला आहे. खेळाडूंची जिद्द, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पदक विजेत्या प्रशिक्षकांचे योग्य नियोजन यामुळेच हे सुवर्ण आणि रौप्य पदक आपण मिळवू शकलो. सर्व विजेत्या खेळाडूंचे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या मार्गदर्शकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो,” अशा शब्दांत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. महाराष्ट्राच्या या दुहेरी यशामुळे संपूर्ण राज्यातील क्रीडा क्षेत्रातून खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
00000000
