कल्याण : डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये सद्ध्या विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. कडक उन्हाळ्यात अनेक वेळा विज पुरवठा खंडित होण्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात काहीजण खुलेआम विज चोरी करीत असल्याचे दिसत आहे. याला महावितरण कर्मचाऱ्यांचा अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिसत आहे.
सद्ध्या एमआयडीसी परिसरात नवीन नाले, गटारीचे कामे एमआयडीसी ठेकेदाराकडून जोरात सुरू आहेत. याकामासाठी रस्ता तोडावा लागत आहे त्यासाठी इलेक्ट्रिक डीगर मशीनची आवश्यकता त्यांना नेहमी लागते. या कामासाठी विज पुरवठा आवश्यक असेल तर महावितरण कडून अधिकृतपणे तात्पुरता विज पुरवठा मिळतो. त्यासाठी लागणारे शुल्क भरावे लागते शिवाय विज मीटर लावावे लागते. परंतु नवीन नाला व गटारे बनविण्यासाठी ठेकेदार हे शॉटकट व अनधिकृतपणे, चोरीने विज पुरवठा घेत असल्याचे दिसत आहे.
गेले अनेक महिने हे राजरोसपणे चालू असून याला महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिसत आहे. सद्ध्या एमआयडीसी निवासी, चार बिल्डिंग, गौरीनंदन सोसायटी जवळ नाल्याचे बांधकाम चालू असून मंगळवार १ जून रोजी दुपारी साडेचार ते सायंकाळी उशिरा पर्यंत महावितरणच्या डीपी बॉक्स मधून अशी अनधिकृतपणे चोरीने विज घेत असल्याचे व्हिडीओ/फोटो हे एका जागरूक नागरिकाने महावितरणचे संबंधित अभियंता/अधिकाऱ्यांना पाठविले असता त्यांनी ‘चेक करून सांगतो’ असे मेसेज पाठविले होते.
त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी यासंदर्भात काय कारवाई केली किंवा ते अधिकृत की अनधिकृत होते हे मात्र अद्याप महावितरण अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले नाही आहे. उलट बुधवारी देखील सकाळपासून त्याच ठिकाणी पुन्हा अनधिकृतपणे महावितरणच्या डीपी बॉक्स मधून बिनधास्तपणे विज पुरवठा घेतला जात आहे. महावितरणचे अधिकारी याबद्दल काहीच बोलत नाहीत किंवा माहिती देत नाहीत.
जर सामान्य नागरिकांचा विज पुरवठा एकसारखा खंडीत होत असेल तर त्याबाबतीत काहीच सुधारणा होताना दिसत नाही. शिवाय जर विजदेयक वेळेवर भरले नाही तर महावितरण कर्मचारी त्वरित विज पुरवठा तोडतात. शिवाय चोरी व इतर कारणामुळे विजेच्या तोटा भरून काढण्यासाठी हा जनतेकडून वसूल केला जात असतो. एकंदर या विज चोऱ्या करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसते.
