उष्मा आणि प्रदूषणाचे प्रमाण होणार कमी
कल्याण :  डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये ठेकेदारांकडून काँक्रिट रस्ते, नाले गटारी इत्यादी बनविताना त्यांना अडसर ठरणारी काही झाडे तोडण्यात आली तर काही झाडांच्या मूळ, खोडाला खोदकाम करताना धक्का बसल्याने ती पडली होती. काही झाडे ही भोवताली काँक्रिट अतिक्रमणाने वेढल्याने व खोडाला जखडून ठेवल्याने तसेच त्यामुळे पाणी न मिळाल्याने तर काही झाडे इतर अनेक कारणांनी मरणासन्न अवस्थेत झाली आहेत. या सर्व कारणांमुळे एमआयडीसी निवासी मधील असलेल्या झाडांची संख्या कमी झाली होती. याचा काही प्रमाणात फटका यावेळी विशेष उन्हाळ्यात येथील नागरिकांना जाणवला. मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी थोडा उष्मा आणि प्रदूषण वाढलेले दिसले.
जागतिक पर्यावरण 5 जून याचे निमित्त साधून आणि त्यानंतर येणाऱ्या पावसाळ्यात एमआयडीसी निवासी मध्ये काही सामाजिक संघटना मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणार आहेत. त्यामुळे काही कारणांने कमी झालेल्या या झाडांची कमतरता भरून काढण्याचा मनोदय या सामाजिक संघटनांनी घेतला आहे.
कल्याण – शीळ आणि सर्व्हिस रोड मधील एमआयडीसीने दिलेल्या त्यांच्या ग्रीन बेल्ट मोकळ्या भूखंडावर नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यास तर्फे शैल गंगा मिलापनगर शहरी वन प्रकल्प  होत आहे. यामुळे एक प्रकाराचे छोटे देशी वृक्षांचे जंगल येथे निर्माण होणार आहे. त्यामुळे विविध पक्षांच्या अधिवास या भागात वाढणार आहे. शिवाय कल्याण शीळ हायवे वरील वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण आणि वाहनांच्या कर्णकर्कश्य आवाजाचे प्रदूषण हे काहीसे कमी होणार असल्याने या शहरी वन प्रकल्पाच्या समोर राहणाऱ्या रहिवाशांना त्याचा फायदा मिळणार आहे.
निवासी विभागांतील प्रसिद्ध अशी सामाजिक संघटना असलेली शिवप्रतिमा मित्र मंडळ यांच्या तर्फे निवासी भागात सर्वेक्षण करण्यात येऊन जेथे झाडांची नितांत आवश्यकता आहे किंवा जेथे पूर्वी झाडे होती पण काही कारणाने ती तोडली किंवा पडली अशा जागी झाडे लावण्याचा संकल्प केला असून साधारण अंदाजे ५० झाडे लावण्याचे त्यांनी ठरविले आहे. विशेष म्हणजे शिवप्रतिमा मित्र मंडळाकडून ही झाडे सात ते आठ फूट उंच असलेली देशी झाडे लावण्यात येणार आहेत. मिलापनगर रेसिडेंड्स वेलफेअर असोसिएशन आणि सायकल सखी ग्रुप यांच्या तर्फे पण निवासी परिसरात येत्या पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. एकंदर या संघटनांच्या वृक्षारोपणाने या निवासी नगरीचा सौंदर्यात वाढ होणार असून वाढत असलेली उष्णता/धग आणि प्रदूषणावर काहीसे नियंत्रण या वृक्षारोपणामुळे होणार आहे.
0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *