नेते पदाधिकाऱ्यां सोबत सर्वसामान्य जनता देखील आंदोलनात सहभागी
मुंबई : महागाईच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गोरेगाव (पश्चिम) रोड ते रत्ना हॉटेल शेजारी केलेल्या एल्गार आंदोलनात नेते व पदाधिकाऱ्यांसोबत सामान्य जनता देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचे दिसून आले. देशासह राज्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजी व सीएनजी गॅसची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे वाढत्या महागाईने कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर गंभीर परिणाम झाला असून जीवनावश्यक वस्तूही महाग झाल्या आहेत या महागाईच्या विरोधात शिवसेनेने रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला असून गुरुवारी झालेल्या आंदोलनात पक्षातील नेते, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य जनता देखील आंदोलनात रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून आले. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल पेटवून आंदोलनास सुरुवात केली गॅस चा बाटला ठेवत महागाई विरोधात घोषणा देऊ लागले त्याच बरोबर मोदी सरकारच्या विरोधात पोस्टर, बॅनर फडकावत ‘मोदी सरकार हाय हाय’ घोषणा दिल्या
शिवसेना विभाग क्र. ३ च्या वतीने केलेल्या या आंदोलन शिवसेना नेते व माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई व शिवसेना नेते, विभाग प्रमुख, आमदार सुनिल प्रभू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात आमदार अनंत (बाळा) नर, विभाग संघटक शालिनी सावंत, विभाग समन्वयक दीपक सुर्वे,विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत, प्रशांत कदम, विधानसभा संघटक राजू पाध्ये, नगरसेवक अंकित प्रभू , सुहास वाडकर, तुळशीराम शिंदे, जितेंद्र वळवी, कैलाशनाथ पाठक,
नगरसेविका लक्ष्मी भाटीया, योगिता कदम, पुष्पा कळबें, लोणा रावत, शिवानी परब, सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह, जेष्ठ शिवसैनिक सर्व संलग्न संघटना कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते महायुती सरकारच्या विरोधात केलेल्या या आंदोलनात शिवसेनेचे विभाग प्रमुख आमदार सुनील प्रभू यांनी पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्याने बैलगाडीतून प्रवास करीत आंदोलन करायचे ठरवले असता तेथेच स्थानिक पोलिसांनी त्यांना तसे करण्यास मनाई केली. यानंतर हातगाडी घेत आंदोलनास सुरवात केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुनील प्रभू यांनी सांगितले की आज सर्वसामान्य माणूस या महागाईच्या विळख्यात सापडला आहे. केंद्र व राज्य सरकारचा निषेध करत लवकरात लवकर दरवाढ मागे घ्यावी तसे न केल्यास ठिकठिकाणी आंदोलन केले जाईल असा इशारा दिला.
