बेस्ट डेपो, निसर्ग उद्यान, मिठी नदीच्या परिसरासह मुंबईतील शेकडो एकर जमीन मोफत अदानीच्या खिशात – खा. वर्षा गायकवाड.
मुंबई : मोदानी सरकार अदानीवर मेहरबान झालेले असून धारावी प्रकल्पाच्या नावाखाली या सरकारने मुंबईतील महत्वाच्या जागा अदानीला मोफत दिल्या आहेत. बेस्ट डेपो, निसर्ग उद्यान, रेल्वेची जमीन, मदर डेअरीची जमीन, मिठी नदीचा परिसर हे सर्व दिले आहे आणि सर्व नियम धाब्यावर बसवून हजारो वृक्षांची कत्तल करून पर्यावरणाचा ऱ्हासही केला जात आहे. हे सर्व फक्त आणि फक्त अदानीसाठीच केले जात आहे, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, धारावी पुनर्वसन प्रकल्प हा धारावीची ओळख पुसून टाकणारा आहे. धारावीकरांना बाहेर हुसकावून लावणे व लाडके उद्योगपती अदानी यांचा विकास करण्यासाठी हा प्रकल्प आहे. धारावीकरांना धारावीतच घरे मिळावीत, ज्यांची दुकाने आहेत, उद्योग आहेत, त्यांचे पुनर्वसनही त्याच जागेवर झाले पाहिजे ही मागणी असताना सरकार मात्र अदानीचे लाड पुरवण्यासाठी पात्र अपात्रतेचा खेळ करून हजारो धारावीकरांना धारावी बाहेर पाठवत आहे. सर्वेच्या नावाखाली गुंडांच्या मदतीने स्थानिकांना धमकावले जात आहे. अदानीचे लोक व फडणवीस व मोदानी सरकार हातात हात घालून धारावीकांना हुसकावून लावण्यासाठी काम करत आहे.
खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लोकप्रतिनिधींनाही फडणविसांचे पोलीस व प्रशासन जुमानत नाहीत, उलट उद्धट उत्तरे देऊन कारवाई करण्याची धमकी देतात. अदानीची सुपारी घेऊन भाजपा महायुती सरकार काम करत आहे. धारावी संदर्भात एक लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने रस्त्यावर आवाज उठवला, सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली पण थातूर मातूर उत्तरे दिली जातात, हा आमचा अनुभव आहे. महायुती सरकार व त्यांचे बगलबच्चे अदानीची वकिली करतात व धारावीकरांना वाऱ्यावर सोडत आहेत. आता सिंगापूर-हाँगकाँगचे जे गाजर दाखवले आहे ते अदानीचे साम्राज्य उभे करण्यासाठी आहे. सर्वसामान्य धारावीकरांना असे गुलाबी स्वप्न दाखवून त्यांची फसवणूक करू नका, असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
धारावीतून मुळ धारावीकरांना बाहेर हाकलून अदानीचे टॉवर उभे करण्यासाठी मोदी-शाह व फडणवीसांचे सरकार पायघड्या घालत आहे. एकीकडे धारावीकरांना त्याच जागेवर घरे व दुकानांना जागा मिळावी यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे पण अदानीसाठी सर्व रान मोकळे आहे. फडणवीस सरकार धारावीच्या विकासाच्या मोठ्या गप्पा मारत आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे. आताही धारावीचा विकास हाँगकाँग-सिंगापूरच्या धर्तीवर करु ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा म्हणजे केवळ भुलभलैय्या आहे. मोदानीच्या शब्दावर धारावीकरांचा विश्वास नाही, असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
00000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *