देवेंद्र सिंग मृत्यूप्रकरणी मोठी कारवाई
संयुक्त पथकाची लवकरच धडक
दिवा : बारा वर्षीय देवेंद्र आशिष सिंग यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार असलेल्या बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी करत धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. संस्थापक अमोल धनराज केंद्रे आणि मुंब्रा शहराध्यक्ष युसुफ जंगबारवाला यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनावर चर्चा करताना डॉ. प्रसाद पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली. देवेंद्र सिंग मृत्यूप्रकरणी बंगाली डॉक्टर शिशिर रॉय यांच्याविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात बोगस डॉक्टर म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी एका डॉक्टरवरही गुन्हा नोंदविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय ठाणे, मुंब्रा, कळवा, दिवा आणि माजिवडा परिसरात कार्यरत असलेल्या अन्य बोगस डॉक्टरांविरोधातही लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बोगस मेडिकल दुकाने तसेच अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवरही प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बोगस पॅथॉलॉजी लॅबविरोधातील कारवाईबाबत शासनाकडून आदेश अथवा पत्र प्राप्त होताच आरोग्य विभाग तातडीने पावले उचलेल, असे आश्वासनही डॉ. पाटील यांनी दिले. तसेच देवेंद्र सिंग यांच्या आई-वडिलांचे जबाब नोंदविल्यानंतर पोलीस तपास पूर्ण करून मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधित व्यक्तींवर योग्य ते गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन (एफडीए), आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहीम राबविण्यात येणार असून बोगस डॉक्टर, बोगस मेडिकल दुकाने आणि इतर अनधिकृत वैद्यकीय व्यवसायांवर धडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या वतीने मृत देवेंद्र आशिष सिंग यांच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच आरोपी शिशिर रॉय यांची मालमत्ता जप्त करून ती रक्कम पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. देवेंद्र सिंग यांच्या मृत्यूमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर आणि तातडीची कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
०००००
