२४ जण पोलिसांच्या ताब्यात, ५६ हजार ६५ रुपयांची रोकड जमा
ठाणे :शहापूर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जुगार अड्डे , मटके आदी अवैद्य बाबींचा सुळसुळाट वाढला असल्याचे दिसून येते. पोलीस अधीक्षक (ठाणे ग्रामीणचे) डॉ. विनयकुमार राठोड यांच्याकडे शहापुरातील स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून शहापूर शहरातील सावंत विहार,कोकणी स्वाद हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये छापा टाकला असता त्या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या २४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५६ हजार ६५ रुपये रोख व जुगार खेळण्याचे साहित्य तसेच तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. शहापूर तालुक्यातील कसारा,किन्हवली,वाशिंद, शहापूर आदी पोलीस ठाण्याच्य हद्दीत बेकायदेशीर धंदे तसेच अवैध भंगार व्यवसाय देखील वाढले असल्याचे दिसून येत आहेत. जुगार व मटके यांना शालेय विद्यार्थी बळी पडत आहेत. या सर्व गोष्टींचा शालेय विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सदरच्या कारवाईत ठाणे पोलीस अधीक्षक ग्रामीण डॉ. विनयकुमार राठोड,अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, पोलीस उपनिरीक्षक निरंजन पाटील, पोलीस शिपाई सचिन बोडके, एस.एस.गायकवाड, आर.टी.निवांगुने, आर. एस. मस्करे, एम.आर.तडवी, चालक पोलीस शिपाई ए.पी. हिलगुडे आदींच्या सहभाग होता. तालुक्यातील बेकायदेशीर धंदे कायमचे बंद करण्याचे काम पोलिसांनी हाती घ्यावे अशी जनतेची मागणी आहे.
