प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर काही तासांत आंदोलन मागे
कल्याण : वेळेवर वेतन न मिळाल्याने संतप्त झालेल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी खंबाळपाडा परिसरातील हजेरी शेडवर कामबंद आंदोलन सुरू केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम झाला आणि हजेरी शेडवर तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, महापालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्या हस्तक्षेपानंतर तोडगा निघाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत पुन्हा काम सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहरातील काही  प्रभागांच्या स्वच्छतेचे कंत्राट सुमित एल्कोप्लास्ट कंपनीला दिले आहे. या कंपनीमार्फत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला ठरावीक तारखेला वेतन दिले जाते. मात्र, यावेळी वेतन मिळण्यास झालेल्या विलंबामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आणि त्यांनी कामबंद आंदोलन छेडले. काही तास चाललेल्या आंदोलनानंतर घनकचरा व्यवस्थापन विभाग, ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत तोडगा निघाला. वेतन तातडीने देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत पुन्हा स्वच्छता कामाला सुरुवात केली.
याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले की, बँकिंग प्रक्रियेतील तांत्रिक कारणामुळे वेतन देण्यास एका दिवसाचा विलंब झाला. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी संबंधित ठेकेदाराला कडक सूचना देण्यात आल्या असून, पुन्हा अशी निष्काळजीपणा झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *