९५ पैकी ९४ विद्यार्थी उत्तीर्ण …!
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची एम बी बी एसची पहिली बॅच आता आरोग्य सेवेसाठी सज्ज झाली असून महाविद्यालयातील ९५ पैकी ९४ विद्यार्थी  उत्तीर्ण झाले असून ९८.९४ टक्के निकाल लागला आहे. २०२१ साली सेना -भाजपा युती सरकारच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या सिंधुदुर्गनगरीत,जिल्हा रुंग्णालयाच्या भव्य संकुलात हे महाविद्यालय सुरु झाले.
महाविद्यालय सुरु झाले तेव्हा कसल्याच सोयी सुविधा नाहीत.स्वतःचे म्हणून असे काहीच नाही. जिल्हा रुंग्णालयाच्या  इमा तींमध्ये आपला संसार थाटला. कोणत्याही मूलभूत, पायाभूत सोयीसुविधा नाहीत.त्यातच जुन्या इमारतींची  पाडापाडी, वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुंग्णालय या दोघांचा संसार एकाच संकुलात सुरु झाला. महाराष्ट्र वैद्यकीय विदयापीठाचा काल निकाल आल्यानंतर अधिष्ठाता डॉ. अनंत दवांगे, त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक,अधिकारी, कर्मचारी वर्ग या सर्वांनी आनंद व्यक्त केला.
नव्याने सुरू झालेल्या या महाविद्यालयात सुरुवातीची दोन -तीन वर्ष परिस्थिती अत्यंत प्रतिकुल होती.अनेक अडचणी होत्या, साधनांची कमतरता, पूर्णपणे तयार नसलेली व्यवस्था आणि नवीन वातावरण. सुरुवातीला सगळ्यांनाच जुळवून घ्यावे लागले. विभाग तयार होत होते, आणि शिकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत होती. महाविद्यालयात वरिष्ठ विद्यार्थी नसल्यामुळे त्यांचेही  मार्गदर्शन नव्हते. त्यामुळे ही पहिली ‘बॅच’ खऱ्या अर्थाने ‘पायोनियर’ ठरली अशी प्रतिक्रिया सहाय्यक प्राध्यापक (मेडिसिन )डॉ. गौरव घुर्ये यांनी व्यक्त केली आहे.
या सगळ्या अडचणी असूनही विद्यार्थ्यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतः अभ्यास केला, एकमेकांना मदत केली आणि उपलब्ध संधींचा योग्य उपयोग केला. शिक्षकांनीही खूप सहकार्य केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
चार-साडेचार वर्षांच्या प्रवासात हे विद्यार्थी खूप काही शिकले.फक्त अभ्यासच नाही तर परिस्थितीशी जुळवून घेणे, आत्मविश्वासाने काम करणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे. त्यांचा प्रवास सोपा नव्हता, पण त्यांनी मेहनतीने तो पूर्ण केला. ‘एमबीबीएस’ पूर्ण केल्याने   ते डॉक्टर झालेच पण त्यांचे यश हे या महाविद्यालयाची मजबूत पायाभरणी ठरली आहे.  अडचणी असल्या तरी मेहनत आणि जिद्दीने यश मिळवता येते.हे त्यांच्या यशामुळे सिद्ध झाले आहे. भविष्यात हे महाविद्यालय विस्तीर्ण होईल आणि प्रगतीचे नवीन टप्पे गाठेल यात शंका नाही. सिंधुदुर्ग वासियांसाठी आरोग्याच्या सुविधा टप्प्याटप्प्याने अत्युच्च दर्जाच्या  होतील असा विश्वास डॉ.घुर्ये यांनी व्यक्त केला आहे.
या यशाबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे,शिंदे सेनेचे स्थानिक आमदार डॉ.निलेश राणे, उबा ठा चे माजी खासदार विनायक राऊत माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील आदींनी सर्व यशस्वी विद्यार्थी,महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अनंत दवांगे,सर्व प्राध्यापक वर्ग ,अधिकारी ,कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
प्रथम क्रमांक- गायत्री शिवराम शिर्के ७४.२२%
व्दितीय क्रमांक- मिथ जयेश जोशी ७३.२२%
तृतीय क्रमांक- सानिका भाऊसाहेब चौगुले ७१.५०%
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *